सांगोला : चटई व शेडनेटमध्ये गुंडाळून गौळवाडीनजीक बुध्देहाळ तलावात टाकून देण्यात आलेल्या शिरविरहीत मृतदेहाची ओळख पटली आहे. विजय विलास सरगर (21) रा. कौलापूर, ता. मिरज जिल्हा सांगली असे मयताचे नाव आहे. मुलाच्या त्रासाला वैतागून बापानेच मुलाचा सुपारी देऊन खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यानंतर बापानेच मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. या घटनेप्रकरणी पाच संशयीत मारेक-यांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील सर्व मारेक-यांना 1 ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
विलास बाबू सरगर (रा. कौलापूर), उत्तम महादेव मदने (रा. डेरवली राम मंदिराजवळ, उरण, पनवेल, मूळ रा. कराडवाडी, ता. सांगोला), प्रकाश गोरख कोळेकर, संतोष विठ्ठल पांढरे, वैभव तानाजी आलदर (सर्व रा. कराडवाडी, काेळा, ता. सांगोला) अशी अटकेतील संशयित हल्लेखोरांची नावे आहेत.
15 जुलै रोजी बुद्धेहाळ तलावात चटई व काळ्या, निळ्या शेडनेटमध्ये शिरविरहीत मृतदेह आढळून आला होता. जवळपास बारा किलो वजनाच्या दगडाला बांधलेला तो मृतदेह पाण्यात टाकण्यात आला होता. पोलिस पाटील यांनी दिलेल्या खबरीनुसार 15 जुलै रोजी याप्रकरणी पोलिस दफ्तरी नोंद घेण्यात आली होती. तपासकामी पोलिसांनी जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात खबरींची मदत घेण्याचे काम सुरु करण्यात आले होते.
दरम्यानच्या कालावधीत संशयित विलास सरगर याने आपला मुलगा विजय हरवल्याबाबतची फिर्याद दाखल केली होती. तपासकामी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावरच संशयाची सुई फिरु लागली. चौकशीअंती विलास सरगर यानेच साथीदारांच्या मदतीने आपला मुलगा विजय याची हत्या केल्याची कबुली दिली. संशयीतांनी 11 जुलै रोजी स्वस्तात डाळींब खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याला वाहनासह बोलावले होते. कोळा येथील हॉटेलवर सर्वांनी जेवण केल्यानंतर रात्री कराडवाडीपासून काही अंतरावरील गौळवाडीनजीक मैदानात त्याल नेण्यात आले. तेथे संशयीत मारेक-यांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. विजयचे शिर कापून त्याचा खून करण्यात आला. शिर नसलेला त्याचा मृतदेह चटई व शेडनेटमधे बांधण्यात आला. बांधलेला तो मृतदेह नंतर दगडाने बांधून बुद्धेहाळ तलावात टाकून देत सर्व मारेकरी पसार झाले होते.
मयत विजय हा त्याच्या आई वडीलांना त्रास देत असे. तो त्यांना मारहाणा देखील करत होता. त्यामुळे त्याचे वडील विलास सरगर यांनी आतेभाऊ उत्तम मदने याच्या मदतीने हत्येचा कट रचला. मयताचे धड सापडले असले तरी शिर सापडले नसून त्याबाबत तपास सुरु आहे. पुढील तपास पो.नि. सुहास जगताप करत आहेत.