मालेगाव येथे तरुणाची रात्री हत्या

नाशिक : आयेशानगर पोलिस स्टेशनला दोघा जणांविरुद्ध तक्रार देणा-या युवकाची मध्यरात्री हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाने दोघा जणांविरुद्ध बुधवारी पहाटे आयेशानगर स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लागलीच रात्री हत्येची घटना घडली.

अनिस अहमद सईद अहमद उर्फ अण्णा (32) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. इस्लामपुरा परिसरातील सुभान सायजिंगजवळ हा हत्येचा थरार घडला. नाशिक जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात हत्येच्या सलग दोन घटना घडल्या आहेत. मंगळवारच्या रात्री अबरार शेख या तरुणाचा तलवारीने खून करण्यात आला होता. त्यानंतर लागलीच काही तासात अनिस अहमद या तरुणाची तिक्ष्ण हत्याराने हत्या झाली.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, डीवायएसपी लता दोंदे यांनी घटनास्थळी धाव घेत तपासकामी अधिका-यांना योग्य त्या सुचना दिल्या. याप्रकरणी आयेशानगर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. सुरेश घुसर करत आहेत. गेल्या महिन्यात हत्या झालेल्या अनिसचे अपहरण करत त्याला मारहाण करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्या जवळ असलेले पाच हजार रुपये व घड्याळ हिसकावून घेण्यात आले होते. याप्रकरणी त्याने आयेशा नगर पोलिस स्टेशनला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. संशयित चोंग्या व शेरा या दोघा जणांनी मयत अनिस अहमद याच्याकडे मोटार सायकल मागितली असता त्याने नकार दिला होता. त्याचा राग आल्यामुळे त्याच्या मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here