मुंबई : राज्य सरकारने आता डायल 112 हा तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम राबवण्याची योजना अंमलात आणण्याचे ठरवले आहे. एखाद्या नागरिकाने 112 क्रमांक डायल करुन तक्रार केल्यास शहरी भागात दहा मिनिटांत आणि ग्रामीण भागात पंधरा मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल होतील अशी व्यवस्था केली जात आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
डायल 112 या प्रकल्पानुसार राज्यातील सर्व 45 पोलीस आयुक्तालयांमध्ये आणि जिल्हा पोलीस कार्यालयांमध्ये आधुनिक पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येतील. पोलिस दलाकडे असलेल्या 1502 चार चाकी व 2269 दुचाकी वाहनांना मोबाइल डाटा टर्मिनल बसवण्यात येईल. जीपीएस सिस्टीम देखील या वाहनांवर कार्यान्वित केली जाणार आहे. सध्या 849 चार चाकी व 1372 दुचाकी वाहनांवर ही यंत्रणा कार्यांन्वित करण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान टेक्निकली फुलप्रफ असल्याचा दावा मंत्र्यांनी केला आहे.
पोलीस व्यवस्था या यंत्रणेच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी सतत कार्यशील राहणार आहे. सदर तंत्रज्ञान वापरण्यासाठी राज्यातील 15 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. डायल 112 या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना पोलिस व्यवस्थेची तातडीची मदत मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत या योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच या प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे.