कित्येक दिवसांपासून बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी व पालकवर्गाचे लक्ष लागलेले होते. दुपारी चार वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर सदर निकाल पाहता येईल. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावेळी राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या होत्या. दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील अंतर्गत मूल्यमापनाचा आधार घेऊन आज बारावीचा निकाल दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाहीर केला जात आहे.
www.maharesult.nic.in
या संकेत स्थळावर विद्यार्थी आपला निकाल बघू शकतात. बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य निकाल देतांना ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी 30 :30 :40 असा निकष राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%),अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयानुसार मिळालेले गुण (30%) आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) अशा प्रकारच्या गुणांचे एकत्रीकरण करुन बारावीचे निकाल जाहीर केले जात आहे.