अमरावती : अमरावती जिल्ह्यात पाय ठेवताना दादागिरी – भाईगिरी दहा किलोमीटर लांब ठेवूनच यायच भाऊ………. अमरावतीत जो कायद्यात राहणार तोच फायद्यात राहणार, कारण कसं आहे ना, कायद्याचा बालेकिल्ला ‘ओनली’ अमरावती जिल्हा…’ असा दिलखेचक संवाद असलेला व हातात पिस्तुलसारखी दिसणारी वस्तू हाती घेत सिनेमातील हिरोप्रमाणे चाल असलेल्या पोलिस कर्मचा-याचा व्हिडीओ अमरावती जिल्ह्यात प्रसारीत झाला. 27 सेकंद एवढा कालावधी असलेल्या या व्हिडीओने अमरावती जिल्ह्यात तुफान प्रसिद्धी मिळवली.
या व्हिडीओच्या माध्यमातून गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा संदेश असला तरी देखील गणवेशधारी पोलिसाने हातात पिस्तुल सारखी दिसणारी वस्तू घेऊन केलेला व्हिडीओ पोलिस खात्याशी योग्य नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अमरावती ग्रामीण पोलिस अधिक्षकांनी त्या कर्मचा-याला निलंबित केले आहे. बक्कल क्रमांक 2413 असलेल्या महेश काळे असे त्या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. चांदुर बाजार पोलिस स्टेशनला कार्यरत असलेल्या महेश काळे या कर्मचा-याची व्हिडीओ तयार करण्यामागची भावना चांगलीच होती. तो व्हिडीओ पोलिस अधिकारी वर्गापर्यंत गेला. व्हिडीओत हिरोप्रमाणे वर्तन करणारा व संवाद फेकणारा तो कर्मचारी अमरावती ग्रामीण पोलिस दलातील असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला निलंबीत करण्यात आले आहे.
काल परवा जळगाव (खान्देश) येथे एका सहायक फौजदाराच्या सेवानिवृत्तीनिमीत्त आयोजीत कार्यक्रमात काही कर्मचा-यांनी “मै हू डॉन” या गाण्यावर थिरकत ठेका धरला होता. हा ठेका एका गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीसोबत धरल्यामुळे त्या पाच पोलिस कर्मचा-यांना हेड क्वार्टरला जाण्याची वेळ आली. दरम्यानच्या कालावधीतच अमरावती ग्रामीण पोलिस दलातील कर्मचा-याने चांगल्या हेतूने तयार केलेल्या व्हिडीओने त्याच्यावर निलंबीत होण्याची वेळ आली. दोन्ही व्हिडीओच्या घटनेत तफावत असली तरी एका ठिकाणी निलंबन तर दुसरीकडे हेड क्वार्टरला जाण्याचा प्रकार समोर आला आहे.