सोलापूर : राज्यात लॉकडाऊनने पुन्हा एकवेळा डोके वर काढले आहे. राज्यसरकारने पुन्हा हरीओम अर्थात अनलॉकचा नारा दिला असला तरी राज्यातील विविध भागात लॉकडाऊन सुरुच आहे. सुरुवातीला केंद्र सरकारने, नंतर राज्य सरकारने, त्यानंतर जिल्हयातील विविध जिल्हाधिका-यांनी व मनपा प्रशासनाने आपाआपल्या सोयीनुसार लॉकडाऊनची प्रक्रीया राबवली आहे.
सध्या सुरु असलेले लॉकडाऊन धड जगू देत नाही व धड मरु देखील देत नाही. शॉपींग कॉम्प्लेक्स बंद असल्यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे. शॉपींग कॉम्प्लेक्स मधील दुकाने, हॉटेल व विविध व्यवसाय बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे बाजारातील पैसे जनरेट होणे थांबले आहे. याचे दुष्परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे.
सोलापूर शहरातील एका हॉटेल चालकाने सोमवार 13 जुलै रोजी पत्नी व दोघा मुलांना गळफास देत स्वत: आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने सोलापुर शहर हादरले. लॉकडाऊन काळात कर्जाचे हप्ते फेडता आले नाही. त्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले गेल्याचे या घटनेतून पुढे आले आहे. अशा प्रकारे एकाच कुटूंबातील चौघांचे जिव गेल्यामुळे सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमोल अशोक जगताप हे हॉटेल व्यावसायीक होते. ते पुर्वी पोलिस लाईन चाळीत रहात होते. त्यांच्या वडीलांचे कोंडी (उत्तर सोलापूर) गावाच्या हद्दीत गॅलक्सी ऑर्केस्ट्रा बार होते. चर वर्षापुर्वी त्यांच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर काही वर्षांनी अमोल जगताप यांनी ते घर सोडून दिले. ते जुना पुणे नाका येथील हांडे प्लॉट मधील गुरुकृपा या इमारतीत सहपरिवार राहण्यास आले. यापुर्वी ते आणि त्यांचा भाऊ असे दोघे मिळून गॅलक्सी ऑर्केस्ट्रा बार चालवत होते. नंतरच्या काळात त्यांनी ते हॉटेल एकट्याने चालवण्यास घेतले.
हॉटेल ब-यापैकी चालत असल्याने त्या बळावर त्यांनी एकुण सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर 23 मार्च पासून सुरु झालेले लॉक डाऊन संपण्याचे नाव घेत नव्हते. सुरु असलेल्या लॉक डाऊनमुळे त्यांचे आर्थिक चक्र बिथरले. हॉटेल बंद झाले. उत्पन्नाचा स्त्रोत थांबला. कर्ज देणा-यांनी आपल्या रकमेसाठी तगादा सुरु केला. लॉकडाऊन सुरु असल्यामुळे घरी बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता.
त्यामुळे अमोल जगताप हे घरीच होते. त्यांची मानसीकता खराब झाली होती.हॉटेल सुरु असतांना त्यांनी खासगी सावकारांकडून पैसे व्याजाने घेतले होते. मात्र लॉक डाऊन काळात व्यवसायच बंद असल्यामुळे ते हतबल झाले होते.
सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अमोल जगताप हे आपल्या बेडरुममधे गेले. तेथे त्यांनी पत्नी मयुरी हिचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर ते बाहेर हॉलमधे आले. गॅलरीत खेळत असलेल्या निष्पाप चिमुकल्या आदित्य व आयुष्य या दोघांचा एकाच साडीत गळा आवळून त्यांची जिवनयात्रा संपवली. अशा प्रकारे तिघांचा जिव त्यांनी घेतला.
तिघांचा जिव घेतल्यानंतर त्यांनी मोठा भाऊ राहुल यास फोन केला. पत्नी व दोघा मुलांचा जिव घेतला असून आता मी देखिल आत्महत्या करत असल्याचे त्यांनी भावाला फोन द्वारे निरोप दिला. पलीकडून त्यांचा भाऊ काही बोलणार तेवढ्यात अमोल जगताप यांनी फोन कट केला. त्यानंतर राहुल या त्यांच्या भावाने पलीकडून फोन लावला असता तो स्विच ऑफ आला. त्यामुळे राहुल जगताप यांनी पोलिस लाईन चाळीतून दुचाकीने अमोल जगताप यांचे घर गाठले.
पहिल्या मजल्यावरील त्यांच्या घराच्या खिडकीतून पाहिले असता त्यांना अमोल व त्यांची दोन्ही मुले लटकलेल्या अवस्थेत दिसली. हा प्रकार पाहताच त्यांनी तात्काळ चावडी पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आपल्या सहका-यांसह हांडे प्लॉट भागातील घटनास्थळी भेट दिली. मृत बालकांचे शव खांद्यावर घेवून जेव्हा बाहेर आणले गेले तेव्हा परिसरातील रहिवाशांचे मन हळहळले. निरागस बालकांचा काय दोष होता असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित झाला होता.
बारावी पर्यंत शिक्षण झालेले अमोल जगताप यांनी त्यांच्या हॉटेल व्यवसायात हळूहळू चांगला जम बसवण्यास सुरुवात केली होती. मात्र अचानक सुरु झालेल्या लॉक डाऊन मुळे पैशांची निर्मिती थांबली ह त्यातून हा दुर्दैवी प्रकार घडला. व्यवसायातून चांगल्याप्रकारे उलाढाल होत असल्याचे बघून अमोल याने सहा लाखाचे कर्ज घेतले होते.
पोलिसांना त्यांच्या घरात मोबाईल व चिठ्ठी सापडली असून त्यातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. अमोल जगताप यांच्यावर कर्ज कशामुळे झाले, त्यांनी ते कुणाकुणाकडून किती घेतले होते याचा तपासात उलगडा होणार आहे. ‘मला माफ करा’ मी मुलांना व पत्नीला संपवले आहे ज्यांचे कर्ज आहे त्यांना परत द्यावे, असे त्यांनी मृत्यूपुर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नमुद केले आहे.
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक आयुक्त कमलाकर ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक साळुंखे व त्यांचे सहकारी तपास करत आहेत.