मेहरुण परिसरातील घरफोडीप्रकरणी दोघांना अटक

जळगाव : जळगाव शहराच्या मेहरुण – गणेशपुरी भागातील सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात झालेल्या चोरीप्रकरणी दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. मोहनसिंग जगदीशसिंग बावरी (20), रा.शिरसोली नाका शिकलकर वाडा, तांबापुरा जळगाव आणि फरीद उर्फ गुल्ली मोहम्मद मुलतानी (19), रा. अजमेरी गल्ली तांबापुरा जळगाव अशी अटकेतील दोघा चोरट्यांची नावे आहेत. दोघांना 3 ऑगस्ट रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अल्पवयीन बालकाचा सहभाग देखील या चोरीच्या घटनेत आढळून आला आहे. त्याला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मोहम्मद युनुस कालु खान या सेवानिवृत्त शिक्षकाच्या अक्सा नगर भागातील घरात 12 जुलै ते 29 जुलैच्या कालावधीत चोरी झाली होती. या घटनेत रोख रकमेसह दागीने असा एकुण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.न. 519/21 भा.द.वि.380, 454, 457, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासा दरम्यान घटनास्थळानजीक असलेल्या हॉटेल रेड चिल्लीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात 27 जुलैच्या मध्यरात्री एक मोटारसायकलस्वार घटनास्थळ परिसरात संशयास्पद अवस्थेत वावरतांना दिसून आला. या सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीअंती चोरटे निष्पन्न झाले. मोहनसिंग व फरीद या दोघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

आरोपी मोहनसिंग जगदीशसिंग बावरी याच्यावर एमआयडीसी, रामानंद नगर व जिल्हापेठ पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एमआयडीसी पोलिस स्टेशनला खून, खूनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे मोहनसिंग याच्यावर दाखल आहेत. साथीदाराच्या मदतीने बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातून मोहनसिंग हा नुकताच जामीनावर सुटून बाहेर आला होता. त्यानंतर लागलीच त्याने हा घरफोडीचा गुन्हा केला.

पोलीस निरीक्षक प्रताप शिंगारे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, सुधीर साळवे, साईनाथ मुंडे आदींच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. मोहनसिंग याच्यासह त्याच्या भावावर देखील घरफोडीचे बरेच गुन्हे दाखल आहेत. न्या. ए. एस. शेख यांच्यासमक्ष दोघांना हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 6  ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारतर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here