पुणे : राष्ट्रीय महिला जुडो रेसलर वैष्णवी ठुबे या खेळाडूला पुणे येथे मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी वानवडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायीक सुमित टिळेकर व राष्ट्रीय खेळाडू वैष्णवी ठुबे यांच्यात हडपसर परिसरातील सिग्नलवर गाडी पुढे घेण्याच्या वादातून हा प्रकार घडला आहे. या मारहाणीत वैष्णवी ठुबे यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे.

गुन्हा दाखल करताना किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे टिळेकर यांना अटकपूर्व जामीन मिळाला असून नंतर याप्रकरणी गंभीर मारहाणीचे कलम वाढवण्यात आले आहे. मारहाण करणा-या टिळेकर यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचे कलम लावण्यात यावे अशी मागणी वैष्णवीकडून करण्यात आली आहे.

मी कोण आहे हे तुला माहीती नाही तुला जिवेच मारतो अशी धमकी दिल्याची तक्रार वैष्णवीने दिली होती. किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केल्यामुळे मारहाण करणा-या टिळेकर यांना जामीन मिळण्याकामी मदत झाली असल्याचा वैष्णवी ठुबे हिचा आरोप आहे.








