जळगाव : अश्लिल शिवीगाळ, मारहाण यासह लज्जास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील नागसेन नगर भागातील रहिवासी झाल्टे परिवारातील चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली रोहीदास झाल्टे, सिंधुबाई रोहीदास झाल्टे, मुकेश रोहीदास झाल्टे व रोहीदास झाल्टे अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघा जणांची नावे आहेत.
एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या नागसेन नगर भागात मोलमजुरी करणारी महिला तिच्या दोघा मुलांसह राहते. या महिलेच्या घराच्या परिसरात वैशाली रोहिदास झाल्टे, सिंधुबाई रोहिदास झाल्टे, रोहिदास झाल्टे व मुकेश झाल्टे असे राहतात. 4 ऑगस्ट रोजी दुपारी सदर महिला मोलमजुरी करुन घरी परत आली. त्यावेळी तिच्या मुलाला झाल्टे परिवारातील चौघे जण मारहाण करत असल्याचे दिसून आले.
आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे बघून सदर महिला भांडण सोडवण्यास व आपल्या मुलाचा बचाव करण्यासाठी गेली. त्यावेळी रोहीदास झाल्टे व मुकेश रोहीदास झाल्टे यांनी सदर महिलेच्या वस्त्राला हात लावल्याचा फिर्यादी महिलेचा आरोप आहे. तसेच वैशाली झाल्टे व सिंधु झाल्टे यांनी सदर फिर्यादी महिलेस खालच्या दर्जाची शिवीगाळ केल्याचा देखील आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या भांडणा दरम्यान चौघांनी महिलेच्या गळ्यातील पोत तोडून नुकसान केल्याचे म्हटले आहे
दरम्यान गल्लीतील लोकांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यात थोडेफार यश आले. या घटनेप्रकरणी मुकेश रोहीदास झाल्टे, रोहीदास झाल्टे, वैशाली रोहीदास झाल्टे, सिंधुबाई रोहीदास झाल्टे या चौघा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. प्रताप शिकारे व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत.