शेगाव : नवजीवन एक्सप्रेसने प्रवास करणा-या प्रवाशांचे दागिने चोरणा-या दोघा चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ताब्यातील दोघा चोरट्यांकडून पाच लाख रुपये किमतीचे दागिने देखील जप्त करण्यात आले आहेत. पत्रकार परिषदेदरम्यान लोहमार्ग मनमाड उप विभागाचे पोलिस अधिकारी दिपक काजवे यांनी सदर माहिती दिली आहे. यावेळी रेल्वे पोलिस स्टेशनचे निरीक्षक सागर गोडवे उपस्थित होते.
नवजीवन एक्सप्रेस सुपरफास्ट एक्स्प्रेसने 27 एप्रिल रोजी प्रवास करणा-या जमुनादेवी राजपुरोहित यांनी आपल्या बर्थवर ठेवलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली होती. या पर्समधे सोन्याचे दागिने व मोबाइल हँडसेट असा 8 लाख 40 हजार 500 रुपयांचा ऐवज होता. प्रवास करणा-या जमुनादेवी पुरोहीत या झोपेत असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला होता. याप्रकरणी आकाश कुमार रुपसिंग राजपुरोहित (रा. विजयवाडा) यांनी शेगाव रेल्वे पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे दाखल गुन्ह्याचा तपास उप निरीक्षक अजय पानपाटील करत होते.
तपासादरम्यान चोरी झालेल्या मोबाईलचे लोकेशन 30 जुलै रोजी पोलिस पथकास मिळाले. त्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सागर गोडे, पोलिस उपनिरीक्षक अजय पानपाटील, पोहेकॉ राहुल गवई, सुनील कवळकर, पोलिस कर्मचारी विशाल जाधव यांच्या तपास पथकाने यवतमाळ येथून रामेश्वर उर्फ ट्यूबलाइट व देविदास राठोड या दोघा चोरट्यांना अटक केली. त्यांच्या कब्जातून 5 लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले.