मित्राच्या बाहुपाशात पत्नीला बघून साधू झाला बेभान!– सायजाबाईला ठार करत संतापात विसरला देहभान!!

imaginary image according to crime story

जळगाव : वयाच्या अठराव्या वर्षीच सायजाबाईचे लग्न साधू मानसिंग बारेला या तरुणासोबत झाले होते. रावेर तालुक्यातील गारबर्डी येथील माहेर असलेली सायजाबाई लग्नानंतर साधूसोबत पाल येथे राहण्यास आली. थंड हवेचे ठिकाण समजले जाणारे पाल हे गाव तिचे सासर झाले. नववधू सायजाबाई लवकरच संसाराच्या रुळावर मार्गस्थ झाली. आदिवासी समाजातील सायजाबाईचे लग्न लवकर झाल्याने तिला मुले देखील लवकर झाली. तिला दोन मुले व एक मुलगी अशी तिन अपत्ये झाली. तिन मुलांची आई असलेली सायजाबाई अवघी तिस वर्षाची होती. तिच्या लग्नाला जेमतेम सोळा वर्ष झाली होती. या सोळा वर्षाच्या संसारात आणि वयाच्या तिशीत तिची तिन्ही मुले ब-यापैकी मोठी झाली होती.

बघता बघता सायजाबाईचा संसार चांगला फुलला आणि बहरला होता. तिच्या संसार वेलीवर तिन फुले उमलली होती. मात्र तिला देखील पतीप्रमाणे मद्यपान करण्याचे व्यसन जडले होते. सायजाबाईचा पती साधू यास मद्यपान करण्याची सवय होती. मोलमजुरी करण्याचे जड काम केल्यामुळे साहजीकच सायंकाळी उतारा म्हणून एक क्वार्टर दारु पिण्याची सवय साधू यास जडली होती. सायजाबाई देखील मोलमजुरी करण्यासाठी जात होती. त्यामुळे संसाराला तिचा देखील हातभार लागत होता. मात्र ती देखील अधुनमधून का होईना मद्यपान करत होती.

आरोपी साधू – आरोपी भायला

पती – पत्नी दोघे मद्यपी असल्यामुळे कुणी कुणाला मद्यपान करण्यावाचून रोखू शकत नव्हते. महात्मा गांधींनी आयुष्यभर मद्यपानाचा निषेध केला. मात्र असे असले तरी मोलमजुरी व जड काम करणा-या मजुर वर्गाला गांधीजींचे चित्र असलेली नोट दिल्याशिवाय दारु विक्रेता उभा करत नाही हे देखील तेवढेच सत्य आहे. मद्याचा स्वाद चाखल्याशिवाय मजुर वर्गाला रात्री बिछान्यावर आराम पडत नाही हे देखील एक कटूसत्य आहे. त्यामुळे साधू व त्याची पत्नी सायजाबाई हे दोघे मद्यपान करत होते.

साधू बारेला याचा एक मित्र होता.  भायला भंगा बारेला असे त्या मित्राचे नाव होते. त्याचे साधूकडे नेहमी येणे जाणे होते. साधूची तिस वर्षाची पत्नी सायजाबाई दिसायला रुपवान होती. तिचे तिशीतील तारुण्य आणी सतेज कांती बघून भायला तिच्या रुपाचा दिवाना झाला होता.  भायला देखील मोलमजुरी करणारा होता. त्यामुळे दोघे सोबतच कित्येकदा मद्यपान करण्यास बसत होते. मद्यपान करणे ही त्यांच्यासाठी एक साधारण गोष्ट होती. त्यांच्या मद्याचा ब्रॅंड देखील फार काही महागडा नव्हता. महागडी स्कॉच व्हिस्की वगैरे हा प्रकार त्यांच्या गावी देखील नव्हता. साधी देशी अथवा हातभट्टीच्या क्वार्टर मधेच हवेत उडता उडता ते जमीनीवर पालथे होत असत. साधूच्या सोबत राहून राहून त्याच्या पत्नीसोबत भायला नजरेचा खेळ खेळत असे. साधूची पत्नी आणि भायला यांच्या नजरेची तार जुळण्यास वेळ लागला नाही. मद्याच्या नशेत साधू जड झाला म्हणजे त्याची पत्नी व भायला एकमेकांना सुचक इशारा करत असत.

5 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी आठच्या सुमारास साधू त्याच्या पत्नीसह शेतात जाण्यास निघाला. त्यांच्यासोबत भायला देखील होता. तिघे जण सोबत शेतात जात असतांना वाटेत त्यांना देशी दारुचे दुकान लागले. त्या दुकानातून भायलाने तिघांसाठी स्वखर्चाने मद्याच्या क्वार्टर स्वरुपातील तिन बाटल्या विकत घेतल्या. शेतात जाण्यासाठी मार्गक्रमण करत असतांना गारखेडा रस्त्यावरील वनखात्याच्या चौकीजवळ तिघांनी मद्यपान करण्यासाठी आपला ठिय्या मांडत कार्यक्रम सुरु केला. मद्य पिणा-या बहुतेकांना मद्य पिण्यासाठी कोणतीही वेळ योग्यच असते. त्यामुळे साधू, सायजाबाई व भायला अशा तिघांनी सकाळच्या वेळी तेथेच बसून मद्यपानाचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली. शेतात जाण्याच्या मुळ उद्देशाने तिघे घरातून निघाले होते. मात्र मद्यपानाचा कार्यक्रमामुळे त्यांनी शेतात जाण्याचा बेत रद्द केला. मद्यपान केल्यानंतर त्यांनी यु टर्न घेत पुन्हा घरी येण्यास सुरुवात केली. त्यावेळी दुपारचे तिन वाजले होते.

भायलावर मद्यपानाचा आता चांगलाच अंमल झाला होता. त्याच्या नजरेसमोर साधूच्या पत्नीचा चेहरा वारंवार येत होता. साधूच्या पत्नीला बघून तो वेडापिसा झाला होता. तिघे सोबतच साधूच्या घरी परत आले होते. मदिरा आणि मिनाक्षी या दोघांचा अंमल भायला यास स्वस्थ बसू देत नव्हता. त्याच्या मनात एक कुविचार चमकून गेला. त्याने युक्ती करत खिशातून 120 रुपये काढून साधूला दिले. या 120 रुपयात अजून दारु घेऊन येण्याचे फर्मान त्याने साधूला सोडले. वारंवार भायलाकडून मोफतची दारु मिळत असल्याचे बघून साधूची कळी खुलली. तो तातडीने त्या पैशांची दारु विकत घेण्यासाठी घरातून बाहेर गेला. तो जाताच भायलाने पुन्हा विस रुपयांची नोट बाहेर काढली. ती विस रुपयांची नोट त्याने साधूच्या मुलीला दिली. या विस रुपयांच्या गोळ्या व चॉकलेट घेऊन ये असे त्याने साधूच्या मुलीला लाडीकपणे सांगितले. अगोदर साधूला दारु घेण्यासाठी व नंतर त्याच्या मुलीला गोळ्या चॉकलेट घेऊन येण्यासाठी त्याने घरातून रवाना केले.  

आता घरात केवळ भायला व साधूची पत्नी असे दोघेच जण होते. या संधीचा फायदा घेत त्याने साधूच्या पत्नीसोबत अंगलट करण्यास सुरुवात केली. साधूच्या पत्नीने देखील मद्यपान केले होते. त्यामुळे तिच्यावर देखील मद्याचा कमी अधिक प्रमाणात अंमल झालेला होता. त्यामुळे तिने भायलाची साथ संगत देण्यास सुरुवात केली. बघता बघता दोघांनी नको ते कृत्य करण्यास सुरुवात केली. दोघांचा खेळ ऐन रंगात येण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी हातात दारुच्या बाटल्या घेऊन दारात आणि घरात साधूचे आगमन झाले. आपली पत्नी व मित्र भायला हे दोघे नको त्या अवस्थेत साधूने पाहिले.

दोघांना नको त्या अवस्थेत बघण्याचा प्रसंग साधूवर आला होता. आपल्यामागे आपली पत्नी व भायला हे दोघे काय काय प्रताप करत असतील हा विचार साधूच्या मनात चमकून गेला. आपल्या पश्चात नक्कीच भायला आपल्या पत्नीसोबत नको ते चाळे करत असेल. त्यासाठीच तो सकाळपासून आपल्यावर फुकटची दारु पिण्यासाठी पैशांची उधळपट्टी करत असल्याचे साधूच्या लक्षात आले. पत्नी सायजाबाई आणि भायला या दोघांना बघून साधूच्या तळपायाची आग मस्तकात जाऊन भिडली.

साधूचा लालबुंद चेहरा बघून आता आपल्यावर हल्ला होणार याची कल्पना भायला यास आली होती. मात्र शिताफीने तो आपले कपडे सावरत तेथून पलायन करण्यात यशस्वी झाला. मात्र पिंज-यात सापडल्यागत सायजाबाईची अवस्था झाली होती. साधूच्या तावडीत ती सापडली होती. घरात पडलेली बाभुळची काठी त्याने हातात घेतली. त्या काठीनेच साधूने तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सायजाबाईच्या दोन्ही हातावर, पायावर, बरगडीवर, उजव्या कानावर, मानेवर जिथे जमेल तिथे साधूने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढे कमी झाले म्हणून की काय त्याने तिला लाथांनी देखील तुडवण्यास सुरुवात केली. सायजाबाईची चुक तिला चांगलीच भोवली होती.

तिचा बचाव करण्यास कुणी नव्हते. त्यामुळे ती पती साधूच्या हातातील काठीने मार सहन करत होती. या मारहाणीत ती केव्हाच बेशुद्ध पडली होती. त्यानंतर भायला याला मारण्यासाठी साधू घरातून बाहेर पडला. भायला जिथे दिसेल तिथे त्याला ठोकून काढायचे हा एकच उद्देश साधूने नजरेसमोर ठेवला होता. मात्र भायला आपला जिव वाचवण्यासाठी पळून  जाण्यात यशस्वी झाला होता. संतापाच्या भरात जवळ असलेली दारु साधूने गटागट प्राशन करुन घेतली.

बराच वेळ शोध घेऊन देखील भायला सापडला नाही. त्यामुळे साधू घाम पुसत पुसत घरी परत आला. त्यावेळी त्याला सायजाबाई खाटेवर निपचिप पडलेली दिसून आली. ती मरण पावली होती. त्याने मुलीला विचारपुस केली असता तिने त्याला सांगितले की मला देखील भायला याने विस रुपये देऊन चॉकलेट घेऊन येण्यास बाहेर पाठवून दिले होते. अशाप्रकारे भायलाने साधू यास दारुच्या तर तिच्या मुलीला चॉकलेटच्या मोहात पाडून आपला कार्यभाग सिद्ध केला होता. मोह हे दुखा:चे कारण असते हे या घटनेतून सिद्ध झाले. काही वेळाने साधू देखील सायजाबाईला तसेच मयत अवस्थेत सोडून घटनास्थळावरुन पसार झाला. हा प्रकार मयत सायजाबाईचे वडील व इतर नातेवाईकांना समजला. मयत सायजाबाईचे वडील चमार दलसिंग बारेला हे नातेवाईकांसह गारबर्डी येथून पाल येथे रात्री साडे नऊ वाजता दाखल झाले. आपली मुलगी सायजाबाई मरण पावली असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांचा जावई साधू पसार झालेला होता. रात्र झालेली असल्यामुळे सर्व जण तेथेच थांबले.

दुस-या दिवशी सकाळी अजुन नातेवाईक घटनास्थळी जमले. या घटनेची माहिती रावेर पोलिस स्टेशनला समजली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह स.पो.नि. शीतलकुमार नाईक, पोलिस उप-निरीक्षक मनोजकुमार वाघमारे, पोलिस उप निरीक्षक अनिस शेख यांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी मयत सायजाबाईचे वडील चमार दलसिंग बरेला (रा.गारबर्डी, ता.रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फरार झालेल्या साधू बारेला याच्याविरुद्ध खुनाचा आणि त्याचा साथीदार भायला बारेला याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा रावेर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 269/21 भा.द.वि. 302, 376, 452 नुसार दाखल करण्यात आला. मयत सायजाबाईचा पती साधू मानसिंग बारेला (रा.पाल, बर्डी ता.रावेर) आणि त्याचा साथीदार भायला भंगा बारेला (रा.पिंपळखुटा, ता.जि.खांडवा) या दोघांना अटक करण्यात आली.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप-निरीक्षक अनिस शेख करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासकामी व दोघा आरोपींच्या अटकेकामी स.पो.नि. शीतलकुमार नाईक, उपनिरीक्षक मनोजकुमार वाघमारे, पोलिस कर्मचारी राजेंद्र राठोड, महेंद्र सुरवाडे, सुरेश मेढे, प्रदीप सपकाळे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, मंदार पाटील, पुरुषोत्तम पाटील, श्रीराम कांगणे, नरेंद्र बाविस्कर, संदीप धनगर, अतुल तडवी, सचिन घुगे, कुणाल पाटील आदींची मदत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here