जळगाव : देशात कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनची तिव्रता वारंवार कमी अधिक प्रमाणात सुरुच आहे. कोरोना विषाणूने थैमान घातले असतांना खाजगी कारखाने बंद आहेत. पर्यायाने रोजगार थांबला आहे. सरकारी कर्मचा-यांचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेले आहेत. अशा परिस्थितीत जिल्हयासह शहरातील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा पालकांकडे फी वसुलीचा सातत्याने तगादा लावत आहेत. शाळा बंद असतांना फी आकारणी कितपत योग्य आहे असा एक हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान ऑनलाईन शाळा सुरू असल्याचा देखावा निव्वळ फी वसुलीसाठी होत असल्याचे पालकवर्गातून म्हटले जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे लॅपटॉप, डेस्कटॉप कॉम्प्युटरची व्यवस्था नाही. अँड्रॉइईड मोबाईलद्वारे प्रशिक्षण लहान विद्यार्थ्यांच्या दृष्टीवर परीणाम करणारा आहे.
फी भरली नाही तर येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याचे नांव शाळेतून कमी करण्यात येणार असल्याच्या धमक्या पालकांना येत आहेत. त्यामुळे पालकवर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा कधी व केव्हा सुरु होणार हे केवळ कोरोना ठरवणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग शहरासह जिल्हयात वेगाने वाढत आहे. त्यामुळे सर्वच नागरिक हवालदिल झाले आहेत. अशा वातावरणात इंग्रजी शाळांचे व्यवस्थापन फी वसुलीची भुमीका चोखपणे बजावत आहे.
या प्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याला कित्येक इंग्रजी शाळांनी सकारात्मक प्रतिसाद देखील दिला आहे. मात्र जळगाव जिल्हयातील इंग्रजी शाळा आपला मनमानी कारभार सोडण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार थांबला नाही तर मनसेची यंत्रणा पालक व विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत मनसे आहे. इंग्रजी शाळांनी सक्तीची फी वसूली थांबवावी यासाठी मनसे आग्रही आहे. तसेच विद्यार्थ्याचे नाव शाळेतून कमी केले जाणार नाही याची ग्वाही शाळा व्यवस्थापनाने पालकांना द्यावी अन्यथा मनसे आंदोलनाच्या तयारीत आहे.
या प्रकरणी मनसेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर अॅड. जयप्रकाश बाविस्कर (माजी आमदार, नेते-मनसे जळगांव – मुंबई) यांच्यासह अनिल वानखडे, माजी जिल्हाध्यक्ष, अॅड. जमील देशपांडे (जिल्हा सचिव), अनिल वाघ- (उपजिल्हाध्यक्ष), अॅड. विलास बडगुजर, तालुका सचिव(चाळीसगाव), विनोद पाठक,शहर अध्यक्ष भुसावळ, रीना साळवी(भुसावळ), चेतन आढळकर, संजय ननावरे (यावल)विनोद शिंदे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष, राजेंद्र निकम,(रस्ते आस्थापना,जिल्हाध्यक्ष) विशाल सोनार,(एरंडोल) कल्पेश पवार,कल्पेश खैरनार(सोशल मीडिया) अविनाश पाटील,संदीप पाटील,संदीप मांडोळे,रज्जाक सैयद, सलीम कुरेशी, योगेश पाटील, (जळगांव) आदींच्या सहया आहेत.