यवतमाळ : दरोड्याच्या तयारीने सक्रीय असलेल्या चौघांना शस्त्रांसह अटक करण्यात अवधुतवाडी पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. लोहारा परिसरातील पॉवर हाऊसनजीक सदर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने यवतमाळ परिसरात खळबळ माजली आहे.
अविनाश लंगोटे (23) मोठे वडगाव ग्रामपंचायत परिसर, दानीश नुरखॉ पठाण (20) इस्लामपुरा कळंब चौक आणि बादल पेडेकर (19) वडगाव अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. या तिघांव्यतिरिक्त एका अल्पवयीन मुलालादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.
लोहारा एमआयडीसी भागात एका ऑटोमधून काही चोरटे फिरत असल्याची माहिती अवधुतवाडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने अविनाश लंगोटे, दानीश नुरखॉ पठाण आणि बादल पेडेकर यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
अटकेतील चोरट्यांवर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलिस कोठडीत रवानगीचे आदेश देण्यात आले. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर, पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. गजानन गजभारे, संतोष चौधरी, नरेंद्र बगमारे, कुणाल पांडे, गोवर्धन वाढई, रवींद्र शेडमाके यांनी कारवाईत सहभाग घेतला.