आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव : जानेवारी महिन्यात आत्महत्या केल्यानंतर काही दिवसांनी सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीनीची खरेदी विक्री करणा-या दलालासह कथित खरेदीदाराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रकाश सुपडू माळी रा.भादली ता.जि.जळगांव व शैलेंद्र वसंत चिरमाडे रा.जळगांव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.न. 543/21 भा.द.वि. 306, 506, 34 नुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की शोभा सुकलाल घोडके या रामेश्वर कॉलनी भागात राहतात. शोभा घोडके यांचे पती सुकलाल लक्ष्मण घोडके यांनी 19 जानेवारी 2021 रोजी घरात कुणी नसतांना गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला 8/21 क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

या घटनेनंतर काही दिवसांनी सुकलाल घोडके यांच्या जुन्या कपड्यांच्या घड्या करत असतांना शोभा घोडके यांना त्यांच्या शर्टाच्या खिशात एक प्लॅस्टीकची कॅरीबॅग आढळून आली. त्यात त्यांना इतर कागदपत्रांसोबत लाल पेनाने लिहिलेली घडी करुन ठेवलेली एक सुसाईड नोट सापडली. त्या चिठ्ठीचा एक तुकडा फाटलेला होता. त्यात नमुद केल्याप्रमाणे प्रकाश सुपडू माळी व शैलेंद्र वसंत चिरमाडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शोभा सुकलाल घोडके यांची सासु विजया लक्ष्मण घोडके यांचे नावे वडीलोपार्जीत धानवड ता.जि.जळगांव शिवारात शेतजमीन असून त्या शेतजमीनीला शोभा घोडके यांचे पती सुकलाल घोडके यांना वारस लावण्यात आले होते. शोभा घोडके यांचे पती जिवंत असतांना त्यांनी सन 2018 मध्ये ती शेतजमीन विक्रीस काढली होती. शेत जमीन विक्री करुन येणा-या रकमेतून त्यांना नवीन घर विकत घेण्याचे नियोजन होते.

याकामी दलाल प्रकाश सुपडू माळी यांनी सदर शेतजमीन विक्री करुन देण्याकामी पुढाकार घेतला होता. सदर शेतजमीन शैलेंद्र वसंत चिरमाडे हे घेण्यास तयार झाले. सदर शेतजमीनीचा सौदा 5 लाख 75 हजार रुपयात ठरला होता. सौदा पावतीच्या वेळी 2 लाख रुपये देण्याचे ठरले होते. उर्वरीत 3 लाख 75 हजार रुपये खरेदी झाल्यानंतर देण्या घेण्याचे ठरले होते. त्यानुसार 5 एप्रिल 2018 रोजी सुकलाल घोडके, विजया घोडके व हर्षल घोडके यांच्यासमक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात सौदा पावती करण्यात आली.

रजिस्टर सौदा पावती झाल्यानंतर ठरल्यानुसार 2 लाख रुपयांऐवजी केवळ 50 हजार रुपये विजया लक्ष्मण घोडके यांना दोघांकडून मिळाले. राहिलेल्या दिड लाख रुपयांबाबत विचारणा केली असता सदर शेतजमीन भोगवटादार वर्ग-2 प्रकारातील असल्यामुळे तिला खरेदीसाठी शासकीय परवानगी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. या परवानगीसाठी लागणा-या खर्चाकामी दिड लाख रुपये आम्ही ठेवून घेत असल्याचे माळी व चिरमाडे यांनी घोडके परिवाराला सांगितले. त्यातून रक्कम शिल्लक राहीली तर देऊ नाहीतर अधिकची लागलेली रक्कम खरेदीच्या उर्वरीत पैशातून वसुल केली जाईल असे प्रकाश माळी यांच्याकडून घोडके यांना सांगण्यात आले. मात्र सौदा झाला त्यावेळी अशी कोणतीही अट टाकण्यात आली नव्हती असे सुकलाल घोडके यांनी प्रकाश माळी यांना म्हटले होते. या शेतजमीनीला सन 2018 ते सन 2021 पर्यंत शासकीय परवानगी मिळालेली नाही.

त्यानंतर सुकलाल घोडके यांनी प्रकाश माळी व शैलेंद्र चिरमाडे यांच्याकडे वेळोवेळी शेतजमीन खरेदीकामी दोघांकडे तगादा लावला. तुम्हालाच शासकीय नजराना भरण्यासाठी पैसे द्यावे लागतील अशी दमदाटी केली जात असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर सन 2006 मधे वडील वारल्यानंतर सुकलाल घोडके यांनी प्रकाश माळी यांच्याकडून उधार घेतलेल्या दहा हजार रुपयांचे 1 लाख 25 हजार रुपये सक्तीने वसुल केले असल्याचे शोभा घोडके यांनी म्हटले आहे.

या सर्व त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी 19 जानेवारी रोजी सुकलाल लक्ष्मण घोडके यांनी घरातु कुणी नसतांना गळफास घेत आत्महत्या करत आपली जिवनयात्रा संपवली. त्यानंतर काही दिवसांनी कपड्यांची आवराआवर करत असतांना शोभा घोडके यांना पती सुकलाल घोडके यांच्या शर्टाच्या खिशातून घडी केलेली व एक तुकडा नसलेली एक चिठ्ठी मिळाली. त्यात दलाल प्रकाश माळी व शैलेंद्र चिरमाडे यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करण्यात आल्याचा मजकुर आढळून आला आहे.
शेतजमीनीची 2 लाख रुपयात सौदा पावती करुन सही घेऊन केवळ पन्नास हजार रुपये देत उर्वरीत रक्कम मिळाली नाही. प्रकाश सुपडू माळी व शैलेंद्र वसंत चिरमाडे यांच्या दडपणामुळे आत्महत्या करत असल्याचे त्या चिठ्ठीत नमुद करण्यात आले आहे. या दोघांमुळे पती सुकलाल घोडके यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी शोभा घोडके यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी प्रकाश दगडू माळी रा.भादली यास त्याच्या गावातून ताब्यात घेण्यात आले आहे. दुसरा संशयीत शैलेंद्र चिरमाडे फरार असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रतिलाल पवार, सचिन पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here