तेल्हारा : पाणी पिल्यानंतर उष्टा ग्लास पिण्याच्या पाण्याच्या माठात बुडवला या कारणावरुन आठ वर्षाच्या बालकाची जमिनीवर आपटून हत्या केल्याची घटना वाडी अदमपूर येथे 7 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी आरोपीस 8 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे.
सोनाली राजु कुमरे वय (29) रा.पोहा ता.कारंजा जि. वाशीम ही विवाहीता आपल्या पतीपासून विभक्त रहात आहे. ती अकोला एमआयडीसी येथे रोजंदारीने काम करते. त्याठिकाणी संजय शामराव नवलकार (30) रा.वाडी अदमपूर ता. तेल्हारा याच्यासोबत तिचा परिचय झाला. विवाहीत संजय शामराव नवलकार यास दोन मुली असून पत्नी त्याला सोडून गेली आहे.त्यामुळे त्याचे व सोनालीचे सुत जुळले व दोघे सोबत राहू लागले.
त्यामुळे सोनाली कुमरे तिची मुलगी व मुलगा या दोघांना सोबत घेऊन त्याच्यासोबत रहात होती. शनिवार 7 ऑगस्ट रोजी सोनाली कुमरे शेतात गेली असता संजय व सोनालीची दोन्ही मुले घरीच होती. दरम्यान सोनालीचा अज्ञान बालक वेदांत याने पिलेल्या पाण्याचा उष्टा ग्लास माठात बुडवला. त्याच्या या कृत्याचा संजय नवलकार यास राग आला. त्यामुळे त्याने बालकास काठी व फुंकणीच्या साहायाने मारहाण करत जमिनीवर आपटले. त्यानंतर बाथरुममध्ये नेऊन त्याच्या छातीवर संजयने दगड ठेवला. त्याचा बचाव करण्यासाठी त्याची दहा वर्षाची बहिण गेली. मात्र तिला देखील त्याने मारहाण केली. सोनाली कुमरे शेतातून परत आल्यावर जखमी अवस्थेतील आपल्या मुलाला तिने तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तो वाचू शकला नाही. याप्रकरणी शवविच्छेदन अहवालानंतर सोनालीने दिलेल्या फिर्यादीनंतर संजय नवलकार यास अटक करण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम करत आहेत.