तरुणाच्या खून प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

On: August 10, 2021 11:04 AM

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील हुसैन कॉलनीत दोन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या वेळी हजर असलेला तरुण समोर दिसताच संतप्त पाच जणांनी त्याला ठार केले. दोघांनी त्याला आपल्या घराकडे ओढत नेले व इतर तिघांच्या मदतीने त्याला बेदम मारहाण करत चाकूने भोसकून ठार केले. 8 ऑगस्टच्या रात्री साडे नऊ वाजता झालेल्या या घट्नेने परिसरात खळबळ माजली होती.

आकाश रुपचंद राजपूत (21) अजिक्य नंगर गारखेडा असे मयत तरुणाचे नाव आहे.  गणेश रवींद्र तनपुरे (19), ऋषिकेश रवींद्र तनपुरे (21), मंगल रवींद्र तनपुरे (40), राहुल युवराज पवार (24), चौघे रा. गल्ली क्र. २, न्यू हनुमाननगर, संदीप त्रिंबक जाधव (45), रा. आंबेडकरनगर अशी तरुणाची हत्या करणा-या संशयीत आरोपींची नावे आहेत. पाचही संशयीत आरोपी अटकेत असून ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. गणेश  व ऋषिकेश भाऊ असून त्यांची आई मंगल आहे. राहुल त्यांचा नात्याने मेहुणा आहे. पाच संशयीतांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

गणेशचे त्याच्या मित्रासोबत हुसेन कॉलनीत वाद झाला होता. त्यावेळी आकाश व त्याचा मित्र सागर केशभट त्याठिकाणी उभे होते. तो राग मनात ठेवत रविवारच्या रात्री सागर आणि आकाश नजरेस पडताच गणेशने त्यांना गल्लीतच पकडले. सागरला भीती वाटल्याने त्याने तेथून पलायन केले. दरम्यान गणेशने आकाशला तेथेच मारहाण करण्यास सुरुवात केली.

काही वेळातच गणेशचा भाऊ ऋषिकेश, मेहुणा राहुल आणि संदीप असे सर्वजण त्याठिकाणी आले. त्यांनी आकाशला ओढत जवळच असलेल्या घराकडे फरफटत नेले. त्याठिकाणी लोखंडी रॉडने आकाशचे गुडघ्यावर आणि डोक्यावर मारहाण सुरु केली. आकाश जमिनीवर पडताच मंगलने त्याला दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान गणेश व ऋषिकेशने आकाशला चाकूने भोसकले. या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आकाशला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सोमवार 9 ऑगस्ट रोजी आकाशचा मृत्यु झाला. या घटनेप्रकरणी आकाशचा भाऊ प्रवीण याने पुंडलीक नगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार पाचही जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. या हत्या प्रकरणातील संशयीतांवर चोरी व मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment