पत्नीची हत्या करुन पतीची दोघा मुलींसह तलावात उडी

बुलडाणा : संशयाने पछाडलेल्या विवाहीत तरुणाने सासरवाडीला येत पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दोघा मुलींना सोबत घेत तलावात उडी घेत आपले व मुलींचे जिवन संपवण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र परिसरातील लोकांच्या मदतीने तलावातील तिघांचे प्राण वाचले. सोमवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास संगम स्मशानभूमी परिसरात असलेल्या जगदंबा नगरात घडलेल्या या घटनेने खळबळ माजली होती. मयत महिलेचे वडील सुरेश तायडे यांनी शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार या घटनेप्रकरणी रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश तायडे यांची मुलगी पूजा हिचा विवाह जालना येथील रहिवासी गजानन विश्वनाथ जाधव याच्यासोबत झाला होता. पूजाला गजाननपासून श्रद्धा, श्रुती व श्रेया अशा तीन मुली झाल्या. चारित्र्यावर संशय घेऊन गजानन नेहमीच पूजाचा छळ करत होता. त्याच्या रोजच्या त्रासाला वैतागून पूजा महिनाभरापासून तिघा मुलींसह बुलडाणा येथे माहेरी राहण्यास आली होती.

रविवार 8 ऑगस्ट रोजी गजानन सासरवाडीला बुलढाणा येथे आला होता. रात्रभर मुक्काम केल्यानंतर सोमवारी सकाळी घरात कुणी नसतांना गजननने पूजावर चाकूने सपासप वार केले. या घटनेनंतर गजाजन याने श्रुती व श्रेया या दोघा लहान मुलींना सोबत घेत नजीकच्या संगम तलावात उडी घेतली.

नागरिकांनी तिघांना पाण्यातून बाहेर काढत त्यांचा जिव वाचवला. दरम्यान पुजाला देखील रुग्णालयात दाखल केले. मात्र ती वाचू शकली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रदीप साळुंखे यांनी तातडीने धाव घेत गजानन याल ताब्यात घेत पुढील कारवाई केली. या घटनेप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला गजाननविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here