नागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दोन आरोपींना अटक करत त्यांच्याकडून तीन पिस्तूल व सात जिवंत काडतुस, बोलेरो कार असा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.शशांक सुनील समुद्रे (२२) रा. पाचपावली आणि ऋषभ राकेश शाहू (२१) रा. कमाल चौक अशी आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे चेनस्नेचिंग पथक गिट्टीखदान परिसरात गस्त घालत होते. दरम्यान त्यांना खबर्याने माहिती दिली की सेमिनरी हिल टीव्ही टॉवर चौकात एक जण बोलेरोत पिस्तूल घेवून ये आहे. पोलिस पथकाने धाव घेऊन बोलेरोत बसलेला आरोपी समुद्रे आणि शाहूची चौकशी केली.
त्यांच्या ताब्यात तीन पिस्तूल मॅगझीन, सात जिवंत काडतुस सापडले. आरोपींकडे पांढऱ्या रंगाची बोलेरो देखील होती. पोलिसांनी समुद्रे आणि शाहूला ताब्यात घेऊन त्यांचे वाहन व पिस्तूल जप्त केले. त्यांच्या विरुद्ध गिट्टीखदान पोलीस स्टेशनला शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. निलेश भरणे, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहाय्यक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या निर्देशाखाली वरिष्ठ निरीक्षक भानुदास पिदूरकर, पोलीस उपनिरीक्षक हेमंत थोरात, राजेश लोही, हवलदार अफसर खान पठाण, सतीश ठाकुर, नायक दयाशंकर बिसांदरे, हिमांशू ठाकूर, विकास पाठक यांनी कामगिरी केली.
यातील आरोपी शशांक समुद्रे हा एमबीएचा विद्यार्थी आहे. हे पिस्तूल यशोधरानगरातील अनु ठाकूर याच्याकडून आपण घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. अनु ठाकुरचा काही दिवसांपूर्वी खून झाला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवस पोलीस कोठडी मिळाली.