आरोपी पतीला चार दिवस कोठडी

बुलडाणा : धारदार शस्त्राने पत्नीची हत्या व दोघा मुलींसह आत्महत्येचा  प्रयत्न करणा-या अटकेतील पतीला 13 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जगदंबा नगर येथील पूजाचा विवाह जालना येथील रहिवासी असलेल्या गजानन जाधव सोबत झाला होता. गजानन हा त्याची पत्नी पूजाच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करत असे. गजाननच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून आपल्या तिघा मुलींसह ती गेल्या एक महिन्यापासून माहेरी बुलढाणा येथील जगदंबा नगर येथे आली होती.

8 ऑगस्ट रोजी गजानन सासरवाडीला आला होता. तेथे देखील त्याने पत्नी पूजाच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यासोबत वाद घालण्याचे काम केले. संतापाच्या भरात धारदार शस्त्राने त्याने पत्नीवर सपासप वार केले. पत्नीला मारहाण केल्यानंतर त्याने दोघा मुलींना घेत जवळच असलेला संगम तलाव गाठला. तलावात त्याने मुलींसह उडी घेतली.

उपस्थित नागरिकांनी त्याला मुलींसह पाण्यातून बाहेर काढत बचाव केला. त्यात तिघा जणांचा जिव  वाचला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 13 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here