औरंगाबाद : क्रेडिट कार्डच्या बिल वसुलीसाठी कंपनी कर्मचा-यांकडून महिलेस अश्लील शिवीगाळ व शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी सिडको पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्याचा तपास करणा-या दोघा पोलिस कर्मचा-यांनी तपासाच्या नावाखाली फिर्यादी महिलेच्या पतीकडून घेतलेल्या रकमेतून पर्यटन केल्याचा आरोप आहे. औरंगाबादचे पोलिस कर्मचारी लक्ष्मण राठोड आणि धोंडिबा घोरपडे अशी दोघा पोलिस कर्मचा-यांची नावे आहेत.
दोघा पोलिस कर्मचा-यांवर करण्यात आलेल्या आरोपाची पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रारदार महिलेच्या पतीकडून तपासकामी प्रवास करण्याच्या बहाण्याने घेतलेल्या रकमेतून काही तासात चौकशी करत दोघा पोलिसांनी वैष्णोदेवी व इतर ठिकाणी सहलीचा आनंद लुटला.
या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघा कर्मचा-यांना निलंबीत करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या प्रकरणी निवेदन देण्यात आले होते.