जामनेर तालुक्यातील वडाळी दिगर येथील प्राथमिक शाळेत शिक्षण आपल्या दारी उपक्रम राबवण्यात येत आहे. कोरोना महामारीमुळे प्राथमिक शाळा अद्याप बंद आहेत. शासन स्तरावर ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
या उपक्रमाचाच एक भाग म्हणून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या दृष्टीकोनातून शिक्षक संदिप पाटील यांनी विद्यार्थी व पालकांच्या गृहभेटी घेत घरपोच अभ्यास सराव पुस्तिका भेट दिल्या आहेत. पालक व विद्यार्थ्यांना शाळा बंद पण शिक्षण सुरु, सेतू अभ्यासक्रम, स्वाध्याय उपक्रम या शासनाच्या उपक्रमांबद्दल तसेच सराव पुस्तिकेच्या माध्यमातून कसा अभ्यास करावा याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
कोरोना महामारीमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. प्रत्येकाला आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पालकांना आर्थिक झळ बसू नये यासाठी शिक्षक संदिप पाटील यांनी स्वखर्चाने अभ्यास सराव पुस्तिका विद्यार्थ्यांना भेटस्वरुपात दिल्या. पालकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष देण्याबाबत, अभ्यासाचे महत्व विषद केले. या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे, मुख्याध्यापक योगेश काळे, उपशिक्षक निलेश भामरे आदींचे मार्गदर्शन लाभले.