जळगाव : राज्यातील विविध व्यापा-यांना करोडो रुपयांचा गंडा घालणारी मनमाडची चौकडी सध्या जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. या चौकडीने धरणगाव येथील व्यापारी व त्याच्या भागीदार कंपनीची देखील करोडो रुपयात फसवणूक केली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील आरोपी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. या गुन्ह्यात अटकेतील चौघांची पोलिस कोठडी 16 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
प्रतिक राजेश भाटीया या तरुण उद्योजकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा धरणगाव येथे आरव्हीसी कॉटन फर्म या नावाने व्यवसाय आहे. 12 डिसेंबर 2019 ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रतिक राजेश भाटीया यांच्या पिंप्री ता. धरणगाव येथील जोगेश्वरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी येथून मनमाड येथील चौघांनी मिळून 3 कोटी 75 लाख 52 हजार 166 रुपये किमतीचे धान्य खरेदी केले आहे.
सदर धान्य प्रतिक राजेश भाटीया यांनी चौघांना विश्वासावर क्रेडीट बिलासह दिले. त्यात निल ट्रेडर्सचे प्रोप्रायटर राहुल कांतीलाल लुनावत यांनी 60 लाख 29 हजार 702 रुपये किमतीचे धान्य खरेदी केले. सुमीत एजन्सीचे प्रोप्रायटर सुमित राजेंद्र लुणावत यांनी 1कोटी 81 लाख 26 हजार 894 रुपये किमतीचे धान्य खरेदी केले. शुभम ट्रेडींगचे प्रोप्रायटर शुभम राजेंद्र लुणावत यांनी 1 कोटी 33 लाख 95 हजार 570 रुपये किमतीचे धान्य खरेदी केले. या सर्वांचा म्होरक्या दिनेश उर्फ योगेश कांतीलील लुणावत हा आहे. या चांडाळ चौकडीने एकुण 1 कोटी 33 लाख 95 हजार 570 रुपयांमधे प्रतिक राजेश भाटीया व त्याच्या भागीदार कंपनीची फसवणूक केली आहे.
सदर गुन्हा धरणगाव पोलिस स्टेशनला गु.र.न. 206 भा.द.वि. 420, 406, 120 (ब), 34 नुसार दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अटकेतील चौघांनी माल खरेदी करतांना त्यांना मिळालेली पावती, बिल, इनव्हाईस, माल वाहतुक करणारी ट्रक यांची कोणतीही प्रत सादर सादर केलेली नसून पुरावा गहाळ करण्याचेच काम केले आहे. अटकेतील चौघा आरोपींची ऐपत नसतांना निव्वळ फसवणूककामी त्यांनी विश्वास संपादन करत प्रतिक भाटीया यांच्या फर्मकडून मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी केले. त्यामुळे याप्रकरणी भा.द.वि. 417, 149 आणि 201 हे कलम देखील वाढवण्यात आले आहे.
या गुन्ह्याची व्याप्ती बघता या चांडाळ चौकडीने चोपडा येथील एका व्यापा-याला सुमारे 2 कोटीत, चोपडा येथीलच एका व्यापा-याला 32 लाख रुपयात, पाळधी येथील एका व्यापा-याला 36 लाख रुपयांमधे तर जळगाव येथील विविध व्यापा-यांना जवळपास 8 कोटी रुपयांमधे फसवले आहे. याशिवाय राज्यातील विविध व्यापा-यांची देखील अटकेतील आरोपींनी करोडो रुपयात फसवणूक केली आहे. मात्र बरेचसे व्यापारी पुढे आलेले नाहीत.