जळगाव : दवाखान्याच्या स्पेशल वार्डातून चोरीस गेलेला मोबाइल आणि मोबाईल चोरटा अशा दोघांना ताब्यात घेत आपली चुणूक दाखवली आहे. गुन्हा लहान असो की मोठा तो तत्परतेने उघडकीस आणणारी टीम त्यासाठी कौतुकास पात्र ठरते. अशीच एक मोबाईल चोरीची घटना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणली आहे.
जळगावच्या जिल्हापेठ हद्दीतील बहिणाबाई उद्यानाजवळ मधुर हॉस्पीटल असून त्या ठिकाणी दिपक सुभाष अहिरे हा तरुण कंपाऊंडरचे काम करतो. जेमतेम पगार असल्यामुळे दिपकला त्याच्या बहिणीने मोबाईल घेऊन दिला आहे. त्या मोबाईलमधे स्वत:चे सिम टाकून तो वापरत असतो. 31 जुलैच्या रात्री त्याची नाईट ड्युटी होती. यावेळी स्पेशल वार्डातील पाच रुग्णांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी दिपकवर सोपवण्यात आली होती.
त्याला देण्यात आलेल्या कंपाऊंडर रुममधे रात्रीच्या वेळी दिपकने त्याचा मोबाईल चार्जिंगसाठी लावला होता. सकाळी त्याला त्याचा मोबाईल जागेवरुन गायब झाला असल्याचे लक्षात आले. गायब झालेल्या मोबाईलचा सर्वत्र शोध घेतला असता तो कुठेही मिळून आला नाही. मोबाईलवर कॉल लावला असता तो स्विच ऑफ येत होता. त्यामुळे आपला मोबाईल चोरी झाल्याची दिपकची खात्री झाली.
दरम्यान एलसीबी पथकातील जितेंद्र पाटील हे काही कामानिमीत्त दवाखान्यात डॉक्टरांना भेटण्यास गेले. त्यावेळी डॉक्टर आणि संबंधीत कंपाऊडरने त्यांना घडलेला प्रकार कथन केला. चर्चेअंती जिल्हापेठ पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याच्या तपासात दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज दरम्यान आढळून आलेल्या संशयीताचे नाव निष्पन्न करण्यात आले. संशयीत आरोपी किरण पाटील (रा.कानळदा ता. जि. जळगाव) असल्याचे उघड झाले.
पो.हे.कॉ.विजयसिंग धनसिंग पाटील, पो.हे.कॉ. सुधाकर रामदास अंभोरे, जितेंद्र पाटील, पो.हे. कॉ. रमेश बाबुलाल चौधरी, पो.ना. नितीन प्रकाश बाविस्कर, पो.ना.प्रीतम पितांबर पाटील, पो.ना.राहुल पाटील यांच्या पथकाने गुप्त बातमीदारामार्फत माहीती घेत किरण पाटील याचा शोध सुरु केला. तो जळगंव तालुका हद्दीतील कानळदा येथे असल्याचा सुगावा तपास पथकास लागला. कानळदा गावातील कन्या शाळेच्या चौकात एका पानटपरी जवळ तो उभा असतांना त्याची सखोल चौकशी केली असता तो किरण पाटील असल्याचे उघड झाले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून दवाखान्यातून चोरी झालेला विवो कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. पुढील तपासकामी त्याला जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.