पुणे : सध्याच्या कलीयुगात व्हॉट्सअप, फेसबुक, ट्वीटर अशा विविध समाजमाध्यमांचा वारेमाप वापर केला जात आहे. सोशल मीडियामुळे सर्व जग एकमेकासोबत जोडले गेले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कोणत्याही देशातील नागरिकासोबत केव्हाही संपर्क साधू शकतो. परंतु या सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच नुकसानदेखील आहे.
तरुण-तरुणी तर या सोशल मीडियाच्या मोठ्या प्रमाणात आहारी गेले असल्याचे दिसून येते. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपमुळे अनेक ठिकाणी वाद देखील होत असल्याचं दिसत आहे. काही वेळा हे वाद टोकाला जातात व त्याची परिणीती हत्येत होत असल्याच्या घटना घडतात.
अशीच एक घटना पुणे जिल्हयाच्या मावळ तालुक्यातील टाकवे येथे काही दिवसांपुर्वी घडली. मोबाईलवर स्टेटस ठेवून चिथावणी देण्याच्या क्षुल्लक कारणाने घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
टाकवे या गावात यश असवले हा २२ वर्षीय तरुण आपल्या परिवारासह रहात होता. या परिसरात यशचे अनेक व्यवसाय होते. यश एक होतकरु तरुण व धाडसी तरुण होता. नावाप्रमाणेच त्याला प्रत्येक उद्योगात यश मिळत होते.
काही वर्षातच तो एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारुपाला आला. उद्योजक असल्यामुळे परिसरातील अनेक लोक त्याच्या संपर्कात आले होते. त्याचे जेवढे मित्र होते तेवढेच शत्रू देखील वाढले होते. अनेक जण यशच्या यशावर जळत असत. तो मेहनती आणि उद्योगी होता.
त्यामुळे त्याला यश मिळत होते. त्यामुळे त्याला मागे खेचण्यासाठी अनेकजण त्याच्यावर टपून बसायचे. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन ते यशसोबत वाद घालायचे.
व्हॉटसअॅपवर ठेवलेल्या डीपीवरुन काही तरुणांनी यशसोबत वाद घातला होता. यशला एकाने जोरदार शिवीगाळ देखील केली. परंतु यशने त्याकडे दुर्लक्ष केलं. तरीही काही तरुण त्याला भडकावण्याचा प्रयत्न करत होते. तरीदेखील यश त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होता.
२३ मे रोजी रात्री जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी यश आपल्या दोघा मित्रांसमवेत घराबाहेर पडला होता. घरापासून काही अंतर गेल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास तीन दुचाकीवरून आलेल्या सात जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यास सुरुवात केली.
व्हॉटसअॅपवर चिथावणी देणारे स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून यशच्या डोक्यात व हातावर सपासप हल्लेखोरांनी सपासप वार केले. हा हल्ला पाहून यश घाबरून गेला. आता काय करावे हे त्याला सुचत नव्हते. आपला जिव वाचवण्यासाठी तो पळू लागला. मात्र हल्लेखोर त्याच्यापेक्षा संख्येने जास्त होते. त्यामुळे तो एकाकी पडला. तो हल्लेखोरांचा सामना करु शकला नाही.
काही क्षणातच तो रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळला. तो जमीनीवर कोसळताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. जिवाच्या आकांताने यशचे विव्हळणे ऐकून परिसरातील काही लोक जमा झाले. त्यांनी त्याला तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. त्याच्या मृत्यूची बातमी गावात पसरण्यास वेळ लागला नाही.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली. वडगाव पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी तीन पथके तयार करत तपासाला सुरुवात केली.
व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवण्यावरून यापुर्वी गावात मयत यशचे काही तरुणांसोबत वाद झाल्याची माहीती पोलिस पथकाला समजली. हाच धागा पकडत पोलिस पथकाने तपासाला गती दिली. तपासात मिळालेल्या माहितीनुसार ऋतिक असवले या तरुणाला चौकशीकामि ताब्यात घेण्यात आले.
त्याची विचारपूस केली असता मयताने व्हॉट्सअॅपवर चिथावणी देणारे स्टेटस ठेवण्याच्या वादातून हा खून झाल्याचे कबुल केले. आपल्या मित्रांच्या मदतीने हा खून झाल्याचे ताब्यातील ऋतिकने कबुल केले. त्यानंतर केवळ पाच तासात ऋतिक अस्वले याच्यासह अजय जाधव, अतिश लंके, विकास रिठे, ऋतिक चव्हाण, अश्विन चोरगे, निखिल काजळे यांना ताब्यात घेतले. ताब्यातील सर्वांनी पूर्ववैमनस्यातून यशचा खून केल्याचे पोलिसांना कथन केले. पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत.