महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटाने धुमाकुळ घातला आहे. त्यात अनेक कुटूंबियांनी त्यांचे प्रियजन गमावले. त्यातून जे जगले वाचले त्यांच्या मदतीच्या पुनर्वसनाच्या धोरणाचा एक तर सरकारला विसर पडला असावा किंवा ते धोरणच हरवले की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ पहात आहे.
आजच्या 21 व्या शतकातील तरुण पिढी आणि साठीच्या घरातील राजकीय – आर्थिक धनसंपन्न समुदाय यांना “लोककलावंत” आणि त्यांचे जीवन समजणार तरी कसे? कधीकाळी राज्यात नोकरी न मिळालेल्या तरुणांना दरमहा शंभर रुपये बेरोजगार भत्ता देण्याचा विचार झाला होता. परंतु सुमारे शंभर वर्षापासून महाराष्ट्रात जनतेच्या मनोरंजनासह स्वत:च्या पोटापाण्याचा उद्योग म्हणून लोककलावंतांनी “तमाशा”चे फड उभे केले. गावोगावी भरणा-या यात्रेत तमाशाचे खेळ मनोरंजन म्हणून सादर करण्यात आले.
एका तमाशाच्या फडात किमान चाळीस ते शंभर लोकांसाठी रोजगार निर्माण केला जातो याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. महाराष्ट्राच्या काही जुन्या पिढ्यांनी “काळू-बाळू”, “दादू-इंदूरीकर” यांच्या लोककलेचा आनंद लुटला. अलिकडच्या काळात दादा कोंडके यांचे “विच्छा माझी पुरी करा”चे प्रयोग मोठ्या प्रमाणात गाजले. “भाऊ-बापू-मांग” बापुराव मुळे मांजरवाडीकर यांचे तमाशा फड महाराष्ट्रभर गाजले. काळ पुढे सरकला. पन्नास वर्षानंतर लोककलेच्या विविध क्षेत्रात काम करणारे कलावंत वृद्धावस्थेत पोहोचले आहेत. लोकशाहीर, गायक, ढोलकी-पेटी वादक, नृत्यांगणा, फड मालक असे शेकडो हजारो लोककलावंत उपासमारीच्या खाईत लोटले गेले आहेत. नाट्यकलावंतांची देखील तशीच अवस्था आहे. मध्यंतरी लोककलावंतांना मानधन देण्याची घोषणा सरकारने केली होती. मे महिन्यात याबाबतचा आदेश होता. सुमारे 80 हजार ते 1 लाखाच्यावर लोककलावंत जगवण्याचा हा भिषण प्रश्न मानवतेच्या भुमिकेतून हाताळला जावा अशी अपेक्षा आहे.
या लोककलवंतांपेक्षाही अत्यंत भिषण अवस्था रेड लाईट एरियातील देहविक्रय करणा-यांची सांगितली जाते. कोरोनाची कठोर नियमावली, संचारबंदी, जनता घरात बसल्यावर यांनी काय करावे? कोण जगवणार त्यांना? नागपुरातील “गंगा- जमुना” एरिया खाली करण्यासाठी प्रशासन त्यांच्या मागे हात धुवून लागले आहे. शेकडो कोटीची गंगा जमुना वस्तीची मोक्याची जागा कुणाला तरी हवी असल्याने त्यांना तेथून उखडून फेकण्यात येतय. मुंबईत “कामाठीपुरा” यासाठी प्रसिद्ध होता म्हणे. पुण्यात कधीकाळी “बावणखणी”- शुक्रवारपेठ गाजली. आजही बुधवार पेठ भागात सायंकाळी सहा वाजेनंतर बाजार भरतो असे म्हणतात. अनेक शहरात अशा वस्त्या सांगितल्या जातात. समाजस्वास्थ्यासाठी या सेवेची आवश्यकता असल्याचे समाजशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. काळाच्या ओघात जळगावचे हैदरी थियेटर, आनंद लोकनाट्य मंडळ हे दोन्ही बंद झाले.
मुंबईतील हजारो डान्स बार, बारबाला, उंची मद्याची रेलचेल, हजारो कोटीचा अंमली पदार्थाचा व्यापार, मुंबईचे नाईट लाईफ हवय असा आर्थिक उलाढालीसाठी आग्रह धरणा-या मंडळींची मने तरुणाईभोवती फिरतांना दिसतात. परंतु कोरोनाच्या संकटाने ज्या लोककलावंत आणि सेक्स वर्कर्सना गळफासापर्यंत आणून सोडले त्यांच्याकडे कोण पाहणार?