नाशिक : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पीए असल्याचे सांगून पोलिस स्टेशनच्या कामात सहकार्य करण्याची ग्वाही देणा-याला अटक करण्यात आली आहे. महेंद्र नारायण पाटील (टकले नगर नाशिक) असे अटकेतील तोतया पीएचे नाव आहे. अटकेतील महेंद्र पाटील याच्याविरुद्ध अंबड पोलिस स्टेशनला माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणूकीचा रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निफाड तालुक्यातील उगाव येथील कासुरे नामक व्यक्तीच्या पत्नीविरुद्ध निफाड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याचे समजते. त्या गुन्ह्यात मदत करण्याचे आश्वासन तोतया पीए महेंद्र पाटील याने कासुरे यांना दिले होते. आपण पालकमंत्र्यांच्या बंगल्यातून बोलत असल्याचे त्याने कासुरे यांचेसोबत बोलतांना म्हटले होते. तुम्ही कुणालातरी पाठवून द्या, जे काय असेल ते करुन घेऊ असे कासुरे यांना पलीकडून बोलणा-या तोतयाने म्हटले होते.
पालकमंत्री भुजबळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महेंद्र पवार यांची भेट कासुरे यांनी याबाबत खात्री केली. मात्र या नावाची कुणीही व्यक्ती याठिकाणी नसल्याचे पवार यांनी कासुरे यांना स्पष्ट केले. पालकमंत्र्यांच्या नावाने सुरु असलेला हा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ. सीताराम कोल्हे, अचलानंद वाघ, अजय शिंदे यांच्या पथकाने तातडीने तपास करत तोतया महेंद्र पाटील यास ताब्यात घेत अटक केली.