रिधानच्या ऑनलाईन अभ्यासासाठी शिखाची वटवट! — हत्या आणि आत्महत्या करत संपवलीच तिने कटकट!!

नाशिक : शिखा आणि सागर सुरेशचंद्र पाठक हे दाम्पत्य नाशिक शहराच्या पाथर्डी फाट्यावरील एका अपार्टमेंटमधे रहात होते. सुखी आणि संपन्न कुटूंब असलेल्या पाठक दाम्पत्याच्या संसारवेलीवर एका बालकाचे आगमन झाले होते. जेमतेम साडेतीन वर्ष वयाच्या बालकाचे नाव त्यांनी रिधान असे ठेवले होते. चिमुकल्या रिधानचा शिखा आणि सागर यांनी त्याला नर्सरीत टाकले होते. सिंम्बॉयोसीस स्कुलमधे नर्सरीच्या स्कुलमधे शिकणारा रिधान यास सध्याच्या शैक्षणिक चालिरीतीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण दिले जात होते.

रिधानची आई शिखा मात्र सारखी त्याच्या अभ्यासाच्या मागेच लागत असे. त्याचे वय अवघे साडेतीन वर्ष एवढेच होते. या साडेतीन वर्षाच्या बालकाचे ऑनलाईन शिक्षण सुरु होते. त्याच्या वयाच्या तुलनेत तो ब-यापैकी शिक्षण घेत अभ्यास करत होता. मात्र त्याची आई शिखा मात्र सतत त्याच्या मागे लागून त्याला अभ्यास करण्यास भाग पाडत होती. आपला मुलगा रिधान याच्या अभ्यासाची तक्रार शिखा पाठक या त्यांच्या आईवडीलांकडे करत असे. शिखा पाठक यांचे माहेर मध्यप्रदेशातील होते. त्यांचे वडील दिलीप शुक्ला हे विज वितरण कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. ते अधूनमधून त्यांची मुलगी शिखा व जावई सागर पाठक यांच्याकडे पत्नीसह भेटायला येत असत.

रिधान हा जेमतेम साडेतीन वर्षाचा बालक होता. त्याचे खेळण्याचे वय असतांना त्याची आई शिखा मात्र अभ्यासासाठी त्याच्या मागे हात धुऊन मागे लागत होती. नर्सरीत जाणा-या रिधानवर ती अभ्यासाचा अती बोजा टाकत असल्यामुळे तो बिचारा चिडचिड करत असे.  रिधानची आई शिखा तिच्या माहेरी वडीलांकडे मुलगा रिधानबाबत तक्रार करत होती. ‘रिधान ऑनलाईन अभ्यासाला बसत नाही तरी तुम्ही  त्याला समजावून सांगा.’ शिखाचे वडील नातू रिधानची तक्रार मुलगी शिखाकडून शांतपणे ऐकून घेत होते. ते तिला समजावून सांगत की तो अजून लहान आहे.

रिधानने आपलेच ऐकावे असा शिखाचा नेहमी हट्ट रहात होता. तिच्या या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तिचे वडील दिलीप शुक्ला हे पत्नीसह नाशिकला आले होते. रिधान अजिबात ऑनलाईन अभ्यास करत नाही वगैरे वगैरे तक्रारींचा पाढा शिखाने तिचे वडील दिलीप शुक्ला यांच्याकडे आल्या आल्या सुरु केला. तिच्या वडीलांनी तिला प्रेमाने समजावून सांगत शांत राहण्यास सांगितले. काही दिवस मुलगी शिखा व जावई सागर यांच्याकडे राहिल्यानंतर मात्र शुक्ला यांना काळजी वाटू लागली. मुलगी शिखा हिचे वागणे व निरागस रिधानवरील ऑनलाईन अभ्यासाचा ताण बघता यातून मार्ग कसा काढावा यावर त्यांनी विचारमंथन सुरु केले. शिखाचा मोबाइल अनवधानाने रिधानच्या हातून खाली पडल्यामुळे नादुरुस्त झाला होता. त्यामुळे रिधानच्या बंद पडलेल्या ऑनलाईन शिक्षणाची शिखाला काळजी लागली होती. 

अखेर 9 ऑगस्ट 2021 चा तो काळा दिवस उजाडला. या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे रिधानचे वडील सागर पाठक आपल्या कामकाजानिमीत्त घराबाहेर पडले. जातांना ते रिधानला देखील सोबत घेऊन गेले. त्यानंतर दुपारी बारा वाजता त्यांनी रिधानला परत घरी आणले. त्यानंतर दुपारी ते पुन्हा कामानिमीत्त घराबाहेर गेले. या दिवशी ही पिता – पुत्राची शेवटची भेट व शेवटचा सहवास ठरला.

दुपारच्या वेळी बाहेर गेलेले शिखाचे वडील दिलीप शुक्ला घरी परत आले. त्यावेळी त्यांची पत्नी टीव्ही बघत होती तर शिखा व रिधान असे दोघे बेडरुममधे झोपले होते. बेडरुमचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे मुलगी व नातू झोपले असतील असा विचार करत शिखाच्या आईवडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. दुपारी चार वाजता चहा पिण्याची वेळ झाली तेव्हा मात्र शिखाच्या आईने तिला व रिधानला आवाज दिला. त्यावेळी आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शिखाच्या वडीलांनी देखील तिला आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दरवाजावर थाप मारण्यास सुरुवात केली तरी देखील आतून आवाज आला नाही.

अखेर शिखाच्या वडीलांना काहीतरी अघटीत झाले असल्याची शंका आली. त्यांनी दाराच्या फटीतून आत डोकावून पाहिले. त्यांना शिखाची उभी सावली दृष्टीस पडली. आपली शंका खरी असल्याची भिती त्यांना सतावू लागली. स्वयंपाक घरातील सांडशीने त्यांनी दरवाजाचा कोपरा कसाबसा उचकटून पाहण्याचा प्रयत्न केला. समोरचे दृश्य बघताच त्यांना हादरा बसला. शिखाने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचे दृश्य त्यांना दिसून आले.

भितीपोटी त्यांनी तातडीने जावई सागर पाठक यांना घरी बोलावून घेतले. सासरे दिलीप शुक्ला यांचा घाब-या आवाजातील निरोप ऐकून सागर पाठक तातडीने घरी परत आले. आल्या आल्या त्यांनी बेडरुमच्या दरवाज्याचे लॉक तोडून आत प्रवेश मिळवला. शिखाने छताच्या पंख्याला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपुष्टात आणली होती. तसेच रिधान हा बेडवर निजलेल्या अवस्थेत होता व त्याची हालचाल बंद होती. त्याच्या शेजारी उशी पडलेली होती. रिधान कदाचीत जिवंत असू शकतो या आशेने त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात तपासणीकामी नेण्यात आले. मात्र त्याने देखील या जगाचा केव्हाच निरोप घेतला होता.

Nilesh Mainkar Sr PI

या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश माईनकर यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ व मृतदेहाचा रितसर  पंचनामा करण्यात आला. त्यानंतर शिखाचे शव उत्तरीय तपासणीकामी सरकारी दवाखान्यात रवाना करण्यात आले. आत्महत्या करण्यापुर्वी शिखाने एक चिठ्ठी लिहीली होती. “आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरु नये, मी जे कृत्य केले आहे ते योग्य आहे” असा मजकूर शिखाने लिहून ठेवला होता.

साडेतीन वर्षाच्या रिधानच्या क्रुर हत्येप्रकरणी शिखाविरुद्ध तिच्या वडीलांनी इंदीरानगर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 153/21 भा.द.वि. 302 कलमानुसार दाखल करण्यात आला. साडेतीन वर्षाचा बालक रिधान हा ऑनलाईन अभ्यास करत नसल्याच्या एकच कारणावरुन शिखाने त्याचा खून केल्याची व स्वत:देखील आत्महत्या केल्याची घटना समाजमन सुन्न करणारी ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here