औरंगाबाद : पहिल्या मुलानंतर आता मुलगी झाली पाहीजे अशी जालना येथील एका दाम्पत्याची अपेक्षा होती. मात्र इश्वराच्या मर्जीने त्यांना मुलीऐवजी दुसरा देखील मुलगाच झाला. आपल्या संसारवेलीवर मुलीची अपेक्षा असतांना मुलगा झाला म्हणून या दाम्पत्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. कुणाच्या झोळीत काय टाकावे याचा सर्वस्वी निर्णय त्या अज्ञात शक्तीच्या हातात असतो याची जाणीव त्या मद्यपी पतीला नव्हती. त्यामुळे तो पत्नीसोबत वाद घालत होता.
आपल्या सुनेसोबत मद्यपी मुलगा घालत असलेला वाद बघून सासूने सुनेला सोबत घेत रिक्षाने जालना येथून औरंगाबाद गाठले. सुन राधा शर्मा व सासू वनमाला या दोघींनी भाड्याच्या रिक्षाने औरंगाबाद येथील मध्यवर्ती बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि घाटीसह विविध झोपडपट्टीचा परिसर धुंडाळला. एखादी लहान बालिका उचलून तिचे अपहरण करायचे हा विडा दोघींनी उचलला होता. रिक्षाने फिरता फिरता दोघींनी औरंगाबाद येथील धुत हॉस्पीटल परिसरातील एका झोपडीजवळ रिक्षा उभी करण्यास सांगितले. मजूर कुटूंब राहणा-या त्या झोपडीत सुमारे तिन वर्षाच्या एका बालिकेवर त्या सासू – सुनेची वक्रदृष्टी पडली. त्या तिन वर्षाच्या बालिकेचे शिताफीने अपहरण करत दोघींनी पुन्हा त्याच रिक्षाने जालना गाठले.
घरी आल्यावर या बालिकेला दत्तक घेतल्याचे त्यांनी सर्वत्र गाजावाजा केला. बालिका दत्तक घेतल्याचे सांगत परिसरात सतरा किलो जिलेबीचे वितरण केले. त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले. मात्र इकडे आपली तिन वर्षाची मुलगी हरवल्यामुळे औरंगाबाद येथील मजूर परिवार हैरान झाला होता. नेहमी नजरेसमोर राहणारी बालिका अचानक बेपत्ता झाल्यामुळे हा मजूर परिवार हवालदिल झाला. धुत हॉस्पीटलजवळ झोपडपट्टीत राहणा-या या मजूर परिवाराने रडत रडत 12 ऑगस्ट रोजी सिडको एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठले. आपली मुलगी हरवल्याचे या परिवाराने धाय मोकलून रडत रडत प्रभारी निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्याजवळ कथन केले.
या परिवाराचे दुख: बघून खाकी देखील काही वेळ गहिवरली. या प्रकरणी बालिकेच्या अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. पो.नि. विठ्ठल पोटे यांनी आपले सहकारी उप निरीक्षक अमरनाथ नागरे, मीरा लाड यांच्या मदतीने पुढील तपास सुरु केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पवन इंगळे यांचे पथक देखील दिमतीला आले. घटनास्थळ असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीच्या कामाला प्रचंड वेग देण्यात आला. डोळ्यात तेल घालून सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासण्यात आले. अखेर एक संशयास्पद रिक्षा तपासणी पथकाला आढळून आली. रात्रीची वेळ असल्यामुळे त्या रिक्षाचा क्रमांक सिसीटीव्ही कॅमे-यात धुसर झाला होता. मात्र त्यातही एक महत्वाचा दुवा मिळाला. “मॉं की दुआ” असे त्या रिक्षावर लिहीलेले आढळून आले. या वाक्याच्या जोरावर तपासकाम रेटून नेण्यात आले.
लागलीच बस स्थानक परिसरातील बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षांची पाहणी करण्यात आली. “मॉं की दुआ” असे लिहिलेल्या रिक्षाचा सर्वत्र शोध घेण्यात आला. एवढ्यावरच हा तपास थांबला नाही तर जालना, परभणी व बिड सह उस्मानाबाद येथील बस स्थानक व रेल्वे स्टेशन परिसरातील सदर वाक्य लिहिलेल्या रिक्षांची पाहणी करण्यासाठी खबरे कामाला लावण्यात आले.
या शोधाशोध कार्यात जालना येथे त्या रिक्षाचा तपास लागला. जालना शहरातील राजीव नगर भागात ती रिक्षा असल्याची माहिती खब-यांकडून पुढे आली. पोलिस उप निरीक्षक अमरनाथ नागरे, हे.कॉ. दयाराम ओहळ, देविदास काळे, अविनाश दाभाडे व नितेश सुंदर्डे यांच्या पथकाने जालना गाठत त्या रिक्षाचालकाला चौकशीकामी ताब्यात घेतले. रिक्षा चालकाने दारु विक्री करणा-या वनमाला मुन्नालाल शर्मा (52) व तिची सुन राधा रवी शर्मा (27) यांच्या घराकडे बोट दाखवले. या दोघींनी त्याच्या भाडोत्री रिक्षाने जालना ते औरंगाबाद असा प्रवास केला होता. औरंगाबाद येथील धुत हॉस्पीटल परिसरातील झोपडीत राहणा-या बालिकेला रात्री झोपेत असतांना पळवुन आणले होते.
या बालिकेला दत्तक घेतल्याचे सांगत सुमारे सतरा किलो जिलेबी वितरीत करुन जल्लोष करण्यात आला होता. आता आपले काहीच होणार अशा अविर्भावात सर्व जण दैनंदीन कामाला लागले होते. अखेर पोलिस पथक या सासू सुनेकडे येवून धडकले. त्यांना अपहरण केलेल्या बालिकेसह ताब्यात घेण्यात आले. तब्बल आठ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बालिका आपल्या आईच्या कुशीत विसावली. दुसरी मुलगी हवी होती मात्र मुलगाच झाल्यामुळे या दोघींनी मुलीचे अपहरण केले होते.