जळगाव : अश्लिल मजकूर व जोडीला महिला पोलिस कर्मचा-याचा मोबाईल क्रमांक असा एक आक्षेपार्ह संदेश गेल्या काही दिवसांपासून जळगाव पोलिस अधिक्षक कार्यालयात वादाचा विषय झाला होता. हा संदेश जळगाव पोलिस अधिक्षक कार्यालयातील काही कर्मचा-यांच्या मोबाईलवर येत होता. या वादग्रस्त संदेशाच्या तक्रारीचा धुर एसपी कार्यालयात सर्वत्र पसरला होता. संबंधीत महिला कर्मचा-याची देखील या प्रकारामुळे कुचंबना झाली होती. समजूतदार सहका-यांनी संबंधित महिला कर्मचा-याकडे वाकड्या नजरेने मात्र पाहिले नाही.
आपल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन आपली बदनामी होत असल्याची कुणकुण संबंधित महिला पोलिस कर्मचा-याला लागली. या वादग्रस्त तक्रारीचा धुर संबंधीत महिलेने वरिष्ठ अधिका-यांपर्यंत नेला. त्यानंतर झालेल्या चौकशीच्या आगीत सदर कारनामे करणा-या सायबर विभागातील कर्मचा-याचे हात मात्र पोळले गेले आहेत.
नरेंद्र लोटन पाटील (वारुळे) असे संबंधीत संशयीत पोलिस कर्मचा-याचे नाव असून त्याबाबत चौकशी सुरु आहे. संशयीत नरेंद्र वारुळे यास अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने नरेंद्र वारुळे यास सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधिक्षक आणि एलसीबी पीआय यांच्या निकटच्या एलसीबी-सायबर शाखेतील कर्मचा-यावर या प्रकारामुळे गजाआड होण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील किचकट गुन्ह्यात गुन्हेगारांचे लोकेशन काढून देण्याकामी मदत करणे, गुन्ह्याबाबत तांत्रीक मदत पुरवणे यात प्रविण असलेल्या नरेंद्र वारुळे या कर्मचा-यास या अश्लिल संदेश प्रकरणाच्या आरोपाखाली संशयीताच्या रुपात अटक झाल्याचे समजताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. पत्रकारांना वेळोवेळी बातम्यांच्या प्रेस नोट पुरवण्याची देखील वारुळे यांच्याकडे जबाबदारी होती. जिल्ह्यातील सर्वच तपासी अधिका-यांना तांत्रिक मदत तत्परतेने वारुळेमार्फत दिली जात होती. मात्र हा प्रकार म्हणजे एक विकृती होती काय असा देखील प्रश्न या निमीत्ताने उपस्थित केला जात आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्टेशनचे स्टेशनचे पो.नि. बळीराम हिरे व त्यांच्या सहका-यांनी या प्रकरणी पाळेमुळे खणत तपासाला सुरुवात केली. ज्या मोबाईल क्रमांकाच्या सिमचा वापर करुन हे संदेश प्रसारीत केले जात होते त्या सिमचा तपास करण्यात आला. मात्र ते सिम बंद असल्याचे तपासात पुढे आले. त्यामुळे या संबंधीत मोबाईल सिमचा रिचार्ज कुठून करण्यात आला याचा पुढील टप्प्यात शोध घेण्यात आला. तपासाअंती संबंधीत सिमकार्डचे रिचार्ज करणा-या दुकानदाराचा देखील शोध घेण्यात यश आले. त्या दुकानदाराकडे ज्या वेळेला रिचार्ज करण्यात आला त्यावेळेचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात संबंधीत कर्मचारी आढळून आल्याने संशयाची सुई संबंधीत कर्मचा-याच्या दिशेने फिरु लागली. या गुन्ह्याशी संबंधीत संशयीत कर्मचारी नरेंद्र वारुळे सध्या पोलिस कोठडीत आहे.