जळगाव : उज्वला गॅसची एजन्सी देण्याचे आमिष दाखवत 10 लाख 30 हजार रुपयात व्यापा-याची फसवणूक करणा-या दोघा भामट्यांना जळगाव सायबर क्राईम शाखेने पठाणकोट (पंजाब) येथून अटक केली आहे. सुनील कुमार सहानी पिता ब्रह्मदेव उर्फ अनिल कुमार (38), रा. गुनाबस्ती पोस्ट तेजपूर जिल्हा समस्तीपूर, बिहार व कन्हैय्या कुमार सहानी पिता राजेंदर सहानी (43), रा. बेलिया घाट मेनरोड कोलकाता असे अटक करण्यात आलेल्या दोघा भामट्यांची नावे आहेत.
यावल तालुक्यातील दहिगाव येथील कालिदास विलास सूर्यवंशी (33) यांना डिसेंबर महिन्यात अनोळखी क्रमांकावरुन बनावट कॉल आला होता. आशितोष कुमार असे बनावट नाव पलीकडून बोलणा-याने कालिदास सुर्यवंशी यांना सांगत उज्ज्वला गॅस एजन्सीची डीलरशिप देण्याचे आमिष दिले होते. गॅसची डिलरशीप घेण्यासाठी लागणारे कागदपत्र भामट्यांनी सुर्यवंशी यांना बनावट पाठवून ते खरे असल्याचे भासवले. त्यानंतर विविध कारणे सांगून कालिदास सुर्यवंशी यांच्या खात्यातून तब्बल 10 लाख 33 हजार वळते करत फसवणूक केली.
याप्रकरणी सायबर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. पो.नि. बळीराम हिरे यांच्या पथकातील वसंत बेलदार, श्रीकांत चव्हाण, प्रवीण वाघ, ललित नारखेडे, नितीन भालेराव या कर्मचा-यांनी पठाणकोट येथून सुनील कुमार व कन्हैया कुमार या दोघा भामट्यांना ताब्यात घेत अटक केली.