औरंगाबाद : पिस्तुलचा धाक दाखवत पेट्रोलपंपाच्या गल्ल्यातील 1 लाख 26 हजार रुपयांची रोकड पळवून नेणा-या दोघांना महाराष्ट्र – गुजरातच्या सिमेवर डांग जिल्ह्यातील सापुतारा येथे अटक करण्यात आली. नवप्रीतसिंग हरसेनसिंग ऊर्फ मनदीपसिंग सुरजितसिंग जाट (36) आणि मोहित ऊर्फ मनी विजय शर्मा (जोबनसिंग प्रीतसिंग जाट) (30), दोघे रा. अमृतसर अशी अटक करण्यात आलेल्या अट्टल दरोडेखोरांची नावे आहेत.
12 ऑगस्टच्या भल्या पहाटे सकाळी दोन वाजेच्या सुमारास माळीवाडा येथील हर्ष पेट्रोल पंपावर दोघा दरोडेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखवत 1 लाख 26 हजार रुपयांची लुट केली होती. या घटनेनंतर दोघा दरोडेखोरांनी नाशिकमार्गे गुजरातच्या दिशेने पलायन केले होते.
त्यानंतर शनिवारी 21 ऑगस्टला या दोघांनी पुन्हा वापी जिल्ह्यातील मायपूर येथील श्रीराम पेट्रोल पंपावर देखील अशाच पद्धतीने लुट केली. दुस-या घटनेत त्यांनी 94 हजार 773 रुपये लुटले होते. या घटनेची गंभीर दखल गुजरात पोलिसांनी घेतली. नाकाबंदीदरम्यान दोघांना गुजरात सिमेवरील डांग जिल्ह्यातील सापुतारा येथे पकडण्यात गुजरात पोलिसांना यश आले. गुजरात पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.