मुंबई : मुंबईच्या फोर्ट भागातील इमारतीचा काही भाग आज जमीनदोस्त झाला. पावसाळा सुरु असतांना कोसळलेल्या इमारतीच्या ढिगा-याखाली कित्येक जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मनपाचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून त्यांच्याकडुन बचावकार्य जोरात सुरु आहे. प्रत्यक्षात किती जण ढिगा-याखाली अडकले आहेत याची आकडेवारी अजून समोर आलेली नाही.
इमारत कोसळण्याची शक्यता असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथील रहिवाशांनी टेकू लावलेला होता. महापालीकेने येथील रहिवाशांना इमारत रिकामी करण्याबाबत वेळोवेळी नोटीस देखील दिलेली होती.
मात्र लॉकडाऊन आणी पावसाळा असल्यामुळे येथील रहिवाशांना सक्तीने बाहेर काढणे मनपाला शक्य झाले नाही. जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात या इमारतीमधील रहिवाशांना नोटीसा देण्यात आल्या होत्या असे समजते.
आजच्याच दिवशी मालाड भागात देखील अशाच प्रकारे इमारत कोसळण्याची घटना घडली आहे. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यापासून पडक्या इमारतीमधील रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटीसा दिल्या जातात. पडक्या इमारतीमधील रहिवाशांनी स्वत:हून इमारत रिकामी करुन देणे गरजेचे असते. मात्र तसे होत नाही.