नांदगाव पेठ – बिहार येथील व्यापाऱ्याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी नांदगाव पेठ शिवारात उघडकीस आली असून खळबळ उडाली आहे. राकेशकुमार रामदास पासवान (लालगंज जिल्हा पाटणा – बिहार)असे मयताचे नाव असून तो गुजरात येथे रहात असल्याचे देखील तपासात उघड झाले आहे.
एक बेवारस कार दोन दिवसांपासून चिखलात अडकली असल्याची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. वाहनाच्या जवळच एका विहीरीजवळ एक मृतदेह पोलिस पथकाला आढळून आला. घटनेच्या वेळी 22 ऑगस्ट रोजी मयत वाहनाच्या स्टेअरींग वर बसला होता व कुणीतरी वाहनाला मागच्या बाजूने धक्का मारत होता अशी माहिती पोलिसांना समजली. गुजरात येथे वास्तव्याला असलेला मयत व्यापारी दर दोन महिन्यांनी बिहार राज्यात जात होता अशी देखील माहिती पुढे आली आहे. मयत राकेशकुमार याची मारेक-यांनी डोक्यात दगड घालून हत्या केल्यानंतर त्याला विहीरीत ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र मारेकरी मयताला तेथेच सोडून पसार झाले असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. या हत्येचे नेमके कारण काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.