सांगली – पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असा दत्तात्रयच्या नावाचा गुन्हेगारी क्षेत्रात जणू काही ब्रॅंड तयार झाला होता. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या दत्तात्रयची भोसे परिसरात मोठीच दहशत पसरली होती. दत्तात्रयचे दोन मित्र होते. सागर सावंत, अमोल खामकर अशी त्यांची नावे होती. दत्तात्रय, सागर आणि अमोल या तिघांची मैत्री भोसे परिसरात सर्वांनाच परिचीत होती. तिघे गुन्हेगार मित्र सोबतच रहात होते. तिघे सोबतच मांसाहार व मद्यपान करण्यास बसत होते. नेहमीप्रमाणे 29 जुलै 2021 रोजी त्यांनी पार्टीचे नियोजन केले होते. मिरज- पंढरपूर रस्त्यावरील बंद अवस्थेतील कारखान्याच्या मोकळ्या जागेत यावेळी पार्टी करण्याचे त्यांनी नियोजन केले होते. रात्रीच्या वेळी हा परिसर ओसाड असतो हे त्यांना चांगले ठाऊक होते.
ठरल्याप्रमाणे तिघे मित्र 29 जुलै 2021 च्या रात्री ठरलेल्या जागी एकत्र जमले. दारु आणि पाण्याच्या बाटल्या, रिकामे ग्लास तसेच सोबतीला चखणा अशा साहित्याची जुळवणी देखील करण्यात आली. जसजसे रात्रीच्या वेळी घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत होते तसतशी तिघांना मद्याची झिंग चढत होती. मद्याचा अंमल तिघांच्या शरीरावर सुरु झाला होता. तिघांचे डोळे जड झाले होते. त्याचे शरीर आणि डोके बधीर होण्यास सुरुवात झाली होती.
दत्तात्रय नेहमी हत्यार सोबत बाळगत असतो याची त्याच्या साथीदारांना चांगल्या प्रकारे कल्पना होती. मद्याच्या नशेत तिघे मित्र स्वत:ला बादशहा समजत होते. कुणी कुणाचे ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. प्रत्येकाची मानसिकता बादशहाची झालेली असतांनाच दत्तात्रयने त्याच्या साथीदारांना सिगारेट आणण्याचे आदेश दिले. मात्र मद्याची नशा अंगी चढल्यामुळे कुणीही डॉन असलेल्या दत्तात्रयचे ऐकले नाही. तू स्वत:ला डॉन समजतो का? तु मोठा डॉन आहेस का? असे त्याच्या इतर मित्रांनी त्याला खडे बोल सुनावले. येथेच तिघांमधे वाद सुरु झाला आणि संघर्षाची ठिणगी पडली.
आपला आदेश ऐकत नाही हे बघून दत्तात्रयने सागर सावंत आणि अमोल खामकर या दोघांना शिवीगाळ सुरु केली. संतापात दत्तात्रयने त्याच्याजवळ असलेला धारदार कोयता बाहेर काढला. कोयत्याच्या धाकावर दत्तात्रयने त्याच्या मित्रांना धमकावण्याचे सत्र सुरु केले. मात्र मद्याच्या आहारी गेलेल्या दत्तात्रयच्या हातातून सागर व अमोलने शिताफीने तो कोयता आपल्या कब्जात घेण्यात यश मिळवले. आता निशस्त्र झालेल्या दत्तात्रयला त्याच्या मित्रांनी जवळच पडलेल्या दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. मद्याच्या नशेत तर्रर्र झालेल्या दत्तात्रयला त्यांचा मुकाबला करणे कठीण झाले होते. दोघांच्या तुलनेत त्याची निशस्त्र शक्ती कमी पडत होती. त्यामुळे नेहमी शस्त्राच्या बळावर दहशत माजवणारा दत्तात्रय आता हतबल झाला होता. प्रत्येक वेळी दादागिरी माजवणारा दत्तात्रय निशस्र झाल्याची संधी हाती येताच संतापलेल्या सागर व अमोलने त्याला दगडाने बेदम मारहाण सुरु केली. त्यानंतर त्याच्याच कोयत्याने त्याला ठार करण्यात आले. दत्तात्रयचा धारदार कोयत्या त्याचाच काळ बनला होता. ज्या कोयत्यावर दत्तात्रय आजवर दहशत माजवत होता त्याच कोयत्याने त्याचे प्राण घेतले होते. कोयत्याचा घाव वर्मी बसल्याने मद्याच्या अधीन झालेला दत्तात्रय रक्ताच्या थारोळ्यात पडला.
आपल्या हातून दत्तात्रयचा खून झाल्याचे लक्षात येताच दोघे मित्र मद्याच्या नशेतून भानावर आले. आता काय करावे हेच त्यांना सुचेनासे झाले. दत्तात्रयच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. अखेर अमोल व सागर या दोघांनी मिळून दत्तात्रचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह मोटारसायकलवर घेतला. तो मृतदेह दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी आणला गेला. हा परिसर देखील निर्जन असल्याची व आपल्यासाठी सुरक्षीत असल्याची त्यांनी खात्री करुन घेतली. दत्तात्रयबद्दल दोघांना एवढी चिड आली होती की त्यांनी त्याच्याच कोयत्याने त्याचे बारीक बारीक तुकडे करण्यास सुरुवात केली. ते तुकडे त्यांनी जवळच पडलेल्या एका पोत्यात भरले. मृतदेहाचे बारीक बारीक तुकडे केल्यामुळे आता या मृतदेहाला ओळखणे कुणालाही शक्य होणार नाही असे त्यांना वाटले. जवळच सुमारे पाचशे फुट खोल असलेला एक बोअर त्यांच्या नजरेस पडला. दोघांनी मिळून त्याच्या मृतदेहाचे तुकडे त्या बोअरमधे टाकले. मृतदेहाचे तुकडे त्या खोल बोअर मधे तळाशी जाऊन पडले. मृतदेहाच्या तुकड्यांची देखील विल्हेवाट लागण्यासाठी त्यांनी दोनशे किलो मिठ खरेदी करुन आणले. ते मिठ त्यांनी खोल बोअरमधे ओतले.
29 जुलै 2021 रोजी दत्तात्रय झांबरे हा मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर गेला होता. तो आज येईल, उद्या येईल असे करत करत तब्बल पंधरा दिवस झाले. तरीदेखील दत्तात्रय घरी परत आला नाही. त्यामुळे त्याच्या घरचे सदस्य हवालदील झाले. अखेर 12 ऑगस्ट 2021 रोजी त्याच्या वडीलांनी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. दत्तात्रय बेपत्ता असल्याबाबत त्यांनी मिसींग दाखल केली. मिसींग दाखल करतेवेळी दत्तात्रयचे मित्र सागर व अमोलवर संशय व्यक्त करण्यास ते विसरले नाही. 46/2021 या क्रमांकाने दाखल केलेल्या मिसींग प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी तपास व चौकशीकामी संशयित अमोल खामकर (27) व सागर सुरेश सावंत (25) या दोघांना पोलिस स्टेशनला बोलावले. सुरुवातीला आपल्याला काहीच माहिती नाही असे म्हणणा-या दोघांनी नंतर पोलिसी खाक्या बघून आपला गुन्हा कबुल केला. दत्तात्रय शामराव झांबरे (24) याचा खून केल्याचे दोघांनी कबुल करत सर्व घटनाक्रम कथान केला.
दत्तात्रयच्या मृतदेहाचे तुकडे करून ते पाचशे फुट खोल बोअरमधे टाकून पुरावा नष्ट केल्याचे त्यांनी पोलिसांजवळ कथन केले. दत्तात्रय शामराव झांबरे याच्या हत्येप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली. सदर गुन्हा गु.र.नं. 296/21 भादवि 302, 201, 34 नुसार संशयित सागर सावंत, अमोल खामकर या दोघांविरोधात दाखल करण्यात आला. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, उपअधीक्षक मिरज अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान बिले, पोलीस उपनिरीक्षक धनंजय विटेकरी, जठार, ए.एस.आय गोडसे, हेड कॉन्स्टेबल वाघमोडे, पोलीस नाईक गाडे आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.