जळगाव – जळगाव शहरात वाळू वाहतुक बंद असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी देखील जळगाव शहरात खुलेआम वाळूची वाहतुक सुरु असल्याचे दिसून येत आहे. वाळू वाहतुक करणा-या सुसाट वाहनांकडून अनेक अपघात झाल्याच्या कित्येक घटना बघण्यास मिळतात. या अपघातात कित्येकांचा जिव गेला आहे.
वाळू वाहतुक बंद असली तरी देखील शिवाजी नगर भागात आज सकाळी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांनी वाळूने भरलेले भरधाव वेगातील एक ट्रॅक्टर अडवले. सदर ट्रॅक्टर चालकाकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नव्हता. सदर ट्रॅक्टरवर नंबर प्लेट नव्हती तसेच वाहनचालकाला नंबर देखील माहिती नव्हता.
सदर ट्रॅक्टर भिला गोटू यांचे असल्याचे वाहनचालकाने गुप्ता यांना सांगितले. सामाजिक कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना घटनास्थळी बोलावले. काही वेळाने तहसीलदार नामदेव पाटील यांनी आपल्या सहका-यांना घटनास्थळार रवाना केले. आलेल्या कर्मचा-यांनी सदर विना क्रमांकाच्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरवर पुढील कारवाईला सुरुवात केली.