अहमदनगर : लाच म्हणून घेतलेली रक्कम चक्क गिळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार आज अहमदनगर जिल्हयात घडला. या प्रकरणी लाचखोर गटविकास अधिका-यास अटक करण्यात आली आहे.
काँक्रिट रस्त्याचे काम केल्यानंतर बिल काढण्यासाठी चार हजारांची लाच गटविकास अधिका-याने तक्रारदारास मागीतली होती. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर सावळी रामरेंगडे (52) असे लाचखोर गटविकास अधिका-याचे नाव आहे.
आज सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून त्यास रंगेहाथ अटक केली. मात्र रंगेहाथ पकडल्यानंतर लाचखोर आरोपीने चक्क लाचेची रक्कमच गिळली. त्यामुळे काही वेळ खळबळ उडाली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. त्यास अटक करण्यात आली.
राजपूर, ता.संगमनेर येथील तक्रारदाराने म्हाळुगी गावात काँक्रिट रस्त्याचे काम केले होते.त्या कामाच्या बिलाच्या रकमेचा धनादेश देण्यासाठी आरोपीने चार हजार रुपये लाचेच्या स्वरुपात मागीतले होते. तक्रारीनंतर नाशीक एसीबीने सापळा रचला होता.
पोलिस अधीक्षक सुनील कडासने व अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला. पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील, हवालदार सुभाष हांडगे, नाईक गीते, वंदना ठोक आदींनी हा सापळा राबवला.