शितलच्या धमकीने सोमनाथ अस्वस्थ झाला फार! – संतापाच्या भरात, चाकूच्या घावात केले तिला गार!!

धुळे – सोमनाथ रमेश कुवर आणि भिकन पाटील यांची दोस्ती प्रसिद्ध होती. अडीअडचणीत दोघे मित्र एकमेकांच्या मदतीला धावून जात होते. दोघांची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी वेळप्रसंगी दोघे एकमेकांच्या मदतीला धावून जाण्यास समर्थ होते. मात्र त्यांच्यातील सामर्थ्य कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हिरावले गेले. दोघांना आपली आर्थिक बाजू पेलण्याचे वांधे झाले.

गेल्या काही वर्षापासून सोमनाथवर विविध प्रकारचे संकट येत होते. त्या संकटांना तोंड देत देत सोमनाथ पुरता वैतागला होता. तो आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत पोहोचला होता. सन 2016 मधे भिकनने त्याला धीर देत आत्महत्येपासून परावृत्त करत त्याचा जिव वाचवण्यात यश मिळवले होते. भिकनची आर्थिक बाजू फार काही भक्कम नव्हती. पोंगे, कुरकुरे तयार करुन त्याची विक्री करुन तो आपला घरखर्च भागवत होता. कोरोना आणि लॉकडाऊन कालावधीत पोंगे, शेंगा, कुरकुरे विक्रीवर मोठा परिणाम झाला होता.  

मित्रत्व निभवणा-या सोमनाथने कठीण परिस्थितीत भाड्याच्या घरात राहणा-या भिकनला वेळोवेळी आर्थिक मदत केली होती. बघता बघता सोमनाथने भिकनला केलेली आर्थिक मदत पन्नास हजार रुपयांपर्यंत जाऊन भिडली होती. कोरोना व लॉकडाऊनमुळे प्रत्येकाला आपली आर्थिक बाजू जबाबदारीने सांभाळण्याची  वेळ आली होती. गेल्या काही महिन्यापासून भिकन हा धुळे शहराच्या देवपूर परिसरातील जगन्नाथ नगर भागात भाड्याच्या घरात राहण्यास आला होता. यावेळी देखील भिकनला सोमनाथनेच मदत केली होती.

आतापर्यंत भिकनला मदत करणारा सोमनाथ स्वत:च आर्थिक अडचणीत आला होता. त्यामुळे भिकनकडे आपले पैसे मागावे असे त्याला वाटत होते. मात्र भिकनची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्याला पैसे मागण्यासाठी सोमनाथचे धाडस होत नव्हते. मात्र आपली आर्थिक अडचण दुर होणे देखील तेवढेच गरजेचे होते. आर्थिक कोंडी झाल्यामुळे सोमनाथ हवालदिल झाला होता. 

भिकनकडे असलेले पैसे मागण्यासाठी सोमनाथच्या पत्नीने त्याच्याकडे तगादा लावला होता. भिकनकडे पैसे बाकी असल्याचे सोमनाथच्या पत्नीला माहित होते. पत्नीचा तगादा आणि पैशांची अडचण लक्षात घेता नाईलाजाने सोमनाथने भिकनकडे पैशांची मागणी सुरु केली. मात्र जवळ पैसे नसल्यामुळे भिकन देखील हतबल झाला होता. कोरोना व लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या भिकनने नातेवाईकांकडून देखील उधारीने पैसे घेतले होते. त्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या जाम झाला होता. त्याच्यामागे नातेवाईकांचा देखील उधार दिलेल्या पैशांसाठी तगादा सुरु होता. लॉकडाऊन संपल्यानंतर जेमतेम सुरु झालेल्या कामातून त्याचा घरखर्च कसाबसा भागत होता.

नातेवाईकांची व सोमनाथची देणी देण्यासाठी भिकनने एका वित्त संस्थेकडे कर्जाची मागणी केली होती. सत्तर हजार रुपयांचे कर्ज कसेबसे मंजूर झाले होते. त्या रकमेतून आधी नातेवाईकांची देणी देण्याचा भिकनचा प्रयत्न होता. मात्र त्यातील पन्नास हजार आपल्याला मिळावे असा सोमनाथचा भिकनकडे आग्रह होता. मात्र अगोदर नातेवाईकांची उधारी अगोदर देण्यासाठी भिकनची पत्नी शितल आग्रही होती. त्या कोंडीत भिकन सापडला होता. अगोदर नातेवाईकांची देणी द्यायची असल्याचे भिकनने सोमनाथला सांगीतले होते. मात्र अगोदर आपले पन्नास हजार द्यावे असा सोमनाथचा सुर होता. सोमनाथची पत्नी भिकनकडील पैसे काढण्यासाठी आग्रही होती. इकडे नातेवाईकांचे  पैसे अगोदर देण्यासाठी भिकनची पत्नी आग्रही होती. मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम हाती पडण्यापुर्वीच दोन्ही कुटूंबात हा वाद सुरु झाला होता.

22 जुलै रोजी सोमनाथने भिकनची पत्नी, शितलची भेट घेवून पन्नास हजार रुपयांची मागणी केली. यावेळी शितलने अगोदर नातेवाईकांचे पैसे दिल्यानंतर तुमचे पैसे दिले जातील असा सुर आवळला. मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला सोमनाथ पार वैतागला होता. संतापाच्या भरात तो शितलला म्हणाला की भिकनने माझे पैसे एक-दोन दिवसांत दिले नाही तर मी त्याचा गेम करुन टाकेन. वैतागलेल्या सोमनाथच्या मुखातून संतापाच्या भरात असे शब्द निघाले होते.

पैशासाठी सोमनाथ आपल्या पतीच्या जीवावर उठणार असल्याचे समजताच शितलचा देखील संताप अनावर झाला. ‘स्वत:ला माझ्या पतीचा जीवलग मित्र म्हणवतोस आणि पैशासाठी त्याचा जीव घेण्याची भाषा करतो, जा नाही देत तुझे पैसे, काय करतोस तू मी पहातेच,’ असा शितलने त्याला दम भरला. ज्या मित्राला आपण वेळोवेळी अडीअडचणीत मदत केली त्याच्या पत्नीकडून असा दम मिळणे सोमनाथला अपेक्षीत नव्हते. त्याच्या मनाला फार वेदना झाल्या. त्याच्या मनात विचारांची खळबळ माजली. विचारांच्या गर्तेत तो घरी परत आला. भिकनने आपले पैसे परत दिले नाही तर करायचे काय? लोकांची देणी कशी दिली जाणार या विचारानेच तो भयभीत झाला होता.

परिस्थिती मनुष्याला संतप्त होण्यास भाग पाडत असते. पैशामुळे नाती व संबंध बिघडतात हे सोमनाथ व भिकन यांच्यातील व्यवहारातून पुढे आले. दोघात मैत्री असली तरी पैशांचा व्यवहार दोघात वितुष्ट निर्माण होण्यास कारणीभुत ठरला. कोरोना व लॉकडाऊनमुळे दोघे अडचणीत आले होते. उधार दिलेले पैसे परत करण्यास भिकनकडून होत असलेली टाळाटाळ लक्षात आल्यावर सोमनाथच्या मनात भिकन व त्याच्या पत्नीबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता. भिकनच्या पत्नीचे बोलणे ऐकून तर सोमनाथच्या मनाची घालमेल वाढली होती. तो फारच अस्वस्थ झाला होता. त्याचे कामात लक्ष लागत नव्हते. जा नाही देत पैसे ……. हे भिकनच्या पत्नीचे वाक्य त्याच्या कानावर सारखे सारखे आदळत होते.

26 जुलै रोजी त्याची मानसिकता पार बिघडली होती. त्याने एक धारदार सुरा सोबत घेतला. भर दुपारी त्याने भिकनच्या घराची वाट धरली. लोकांची देणी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच भिकनच्या पत्नीचे बोल त्याला हैरान करुन सोडत होते. त्याचे मन बधीर झाले होते. नेहमी पुढच्या दाराने भिकनकडे जाणारा सोमनाथ आज मागच्या दरवाजाने भिकनच्या घरात शिरला. नेमका हाच प्रसंग परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला.

भिकनची वृद्ध आई घराच्या पुढच्या खोलीत नातवंडांसमवेत बसली होती. भिकन कुठेतरी बाहेर गेला होता. भिकनची पत्नी शितल स्वयंपाकघरात कामकाज करत होती. शितल स्वयंपाकघरात असतांनाच सोमनाथ तिच्याजवळ गेला. सोबत आणलेल्या धारदार चाकूने त्याने शितलवर सपासप वार केले. शितल रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळण्यास वेळ लागला नाही. सोमनाथ तसाच मागच्या दाराने पळून जाण्यात यशस्वी झाला.

शितलची आरडाओरड ऐकून तिची सासू धावतच स्वयंपाकघरात आली. स्वयंपाकघरातील दृष्य पाहून तिने देखील आरडाओरड करत परिसरातील लोकांना जमा केले. या घटनेची माहिती पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला समजताच पो.नि. रविंद्र देशमुख व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. भिकनला या घटनेची माहिती समजताच तो देखील तातडीने घरी परत आला. शितलचा मृतदेह शव विच्छेदनकामी सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहीतीतून संशयीत म्हणून भिकनचा मित्र सोमनाथ कुवर याचे नाव पुढे आले. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून केलेल्या तपासात सोमनाथ कुवर हा घटनेच्या दिवशी व वेळी मागच्या दरवाजाने घाईघाईत आत येतांना व बाहेर जातांना आढळून आला. त्याचा तपास केला असता तो फरार झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संशयाची सुई सोमनाथवर फिरु लागली. पश्चिम देवपुर पोलिस स्टेशनला सोमनाथ कुवर याच्याविरुद्ध शितलच्या खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे वृत्त लिखान सुरु असेपर्यंत सोमनाथ कुवर फरार होता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here