औरंगाबाद – औरंगाबाद येथील हनुमान नगर भागात राहणा-या महिलेला शिवीगाळ व रॉडने मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे जिल्हा सचिव अशोक दामले व त्यांची पत्नी अशा दोघांविरुद्ध पुंडलीक नगर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
29 ऑगस्ट रोजी सकाळच्या वेळी पिडीत महिला ती रहात असलेल्या घरासमोर साफसफाई करत होती. त्यावेळी दामले यांची पत्नी देखील घराबाहेर अंगण झाडत होत्या. दामले यांच्या पत्नीने पिडीत महिलेला उद्देशून शिवीगाळ केली. त्यावर पिडीत महिलेने दामले यांच्या पत्नीला म्हटले की तुम्ही मला शिवीगाळ करता व माझे नाव खराब का करता? स्वत:चा नवरा काय करतो ते बघा. सदर महिलेचे उत्तर ऐकून सौ.दामले यांनी त्यांचे पती व भाजपचे जिल्हा सचिव अशोक दामले यांना बाहेर बोलावले.
संतापलेल्या दामले यांनी हातात स्टीलचा रॉड आणला. शेजारच्या महिलेला शिवीगाळ करत हातातील स्टीलच्या रॉडने मारहाण सुरु केली. या मारहाणीत शेजारी राहणारी महिला गंभीर जखमी झाली व चक्कर येऊन खाली पडली. गल्लीत राहणा-या नागरिकांनी जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. पिडीतेने दिलेल्या तक्रारीनंतर पुंडलीक नगर पोलिसात दामले दाम्पत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर दामले यांच्यासह परिसरातील नागरिकांनी पिडीत महिलेविरुद्ध पोलिस स्टेशनला एक अर्ज दिला. सदर महिलेकडे रात्री बेरात्री लोक येतात व मद्यप्राशन करुन धिंगाणा घालतात असा आरोप या अर्जात करण्यात आला आहे.