धुळे : शहरातील शिवाजी रस्त्यावरील कालिका माता मंदिराजवळ ट्रॅकॉन कुरियर कंपनीत काम करणाऱ्या जितेंद्र शिवाजी मोरे या तरुणाची डोक्यात दगड घालून 11 तारखेला हत्या झाली होती. धुळे शहर पोलिसात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु होता. तपासात मिळालेल्या माहितीवरून दोघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
या खून प्रकरणी राहुल उर्फ हंक्या सुनील घोडे, रा दैठणकर नगर, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे व हर्षल जिजाबराव पाटील या दोघांना अटक करण्यात आली. आरोपी मयताकडील पैशांसह मोबाईल हिसकावत होते. मयताने प्रतिकार केल्यामुळे आरोपींनी संतापात त्याच्या डोक्यात दगड टाकल्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल केली.
दि.11 रोजी रात्री 12.40 वाजता काही मुले बसस्थानकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात होते. त्यावेळी कमलाबाई शाळेजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघा आरोपींनी 1200 रुपयांसह दोन मोबाईल लांबवले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती. त्यांनी आरोपींचे वर्णन प्राप्त केले. या वर्णनानुसार पोलिस आरोपी हंक्या घोडेपर्यंत पोहोचले. त्यानंतर हर्षल पाटील यालादेखील अटक करण्यात आली.