वंदनाच्या वागण्यात बदल झाला, तेच सुरेशला खटकले!– संतापाच्या भरात त्याने मध्यरात्री तिला सुरीने भोसकले!!

जळगाव – सुरेश सुकलाल महाजन हा वयाच्या विशीत जळगावला कामधंद्यानिमीत दाखल झाला होता. त्याचे बालपण चोपडा येथे गेले होते. चोपडा येथून कामधंद्यानिमित जळगावला आलेल्या सुरेशचे शिक्षण कमी होते. त्यामुळे मिळेल ते काम करण्याची त्याची तयारी होती. धडधाकट सुरेशने रोजगार निर्मीतीसाठी थेट एमआयडीसीतील भाजीपाला मार्केट गाठले. गावोगावचे शेतकरी आपला भाजीपाला या मार्केटमधे भल्या पहाटे विक्रीला आणतात. हा भाजीपाला दलालांच्या माध्यमातून लिलाव पद्धतीने खरेदी – विक्री केला जातो. भाजीपाला खरेदी विक्रीच्या या भल्यामोठ्या बाजारपेठेत सुरेशने हमालीकाम सुरु केले. अंगाने धडधाकट असलेल्या सुरेशला हमालीकामातून चांगली धनप्राप्ती होऊ लागली. सकाळी दहा वाजण्यापुर्वीच त्याच्या पॅंटच्या खिशात भारतीय चलनी नोटांचा चांगल्या प्रमाणात संचय होऊ लागला. त्यामुळे सुरेशचे चोपडा येथून जळगावला येणे जणू काही सार्थकी लागले होते.

तो हमालीकाम करत असलेल्या भाजीपाला मार्केटमधे एक महिला दररोज भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत होती. भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणा-या त्या महिलेचे नाव वंदना गोरख पाटील असे होते. दररोज सकाळी हमाली कामानिमीत्त सुरेशचे व भाजीपाला खरेदीसाठी वंदनाचे एकाच ठिकाणी येणे जाणे होते. वंदना येत असल्याची चाहुल त्याला लागत होती. ती येत असल्याचे त्याला लांब अंतरावरुनच दिसत असे. वंदनाचा हसतमुख चेहरा दिसला म्हणजे इकडे सुरेशच्या मनाची कळी खुलत असे. भल्या पहाटे वंदनाचा हसतमुख चेहरा बघून सुरेशला हमालीकाम करण्यात हुरुप येत असे. तिच्या भाजीपाल्याचे ओझे तो तिला विनाशुल्क उचलपटक करुन देत होता. त्यामुळे तिच्या मनात  सुरेशबद्दल आस्था निर्माण झाली होती.

दिवसामागून दिवस जात होते. भिंतीवरील कॅलेंडरच्या तारखा बदलत होत्या. मात्र सुरेशचे वंदनावरील प्रेम बदलण्यास तयार नव्हते. तसे बघता सुरेश हा विवाहीत होता. हमालीकामाला सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच त्याचा विवाह झाला होता. विवाहानंतर त्याच्या संसारवेलीवर दोन पुत्ररत्नांचे आगमन झाले होते. दरम्यानच्या कालावधीत वंदनाच्या पतीचे निधन झाले. ती विधवा झाली होती. तिला विवाहीत सुरेशची भावनिक साथ लाभली होती. सुख दुखा:त तो तिच्या मदतीला एका पायावर धावून येत होता. त्यामुळे साहजीकच तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेमाचा अंकुर फुलला होता. त्याच्या मनाची अवस्था देखील काही वेगळी नव्हती.

हळूहळू सहवासातून दोघांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेमाचा  अंकुर फुलला होता. दोघात प्रेमसंबंध निर्माण होण्यास वेळ लागला नाही. दिवसागणीक दोघांचे वय वाढत होते. त्याप्रमाणे दोघातील प्रेम देखील वाढतच होते. सुरेशची मुले मोठी होत गेली. दोन्ही मुले मोठी झाल्यानंतर एमआयडीसीत कामाला जाऊ लागली. विधवा वंदनाचा मुलगा देखील मोठा होत गेला. सुरेश आणि वंदना यांच्यातील प्रेमसंबंधाची कल्पना परिसरातील लोकांना आलेली होती. सुरेशच्या घरात देखील दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे समजले होते. मात्र त्यांच्या प्रेमसंबंधात कुणी आडकाठी आणली नाही. गेल्या विस वर्षापासून दोघांचे प्रेमसंबंध कायम होते. आज सुरेशने वयाची पन्नाशी ओलांडली होती तर वंदनाने चाळीशी ओलांडली होती.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईची झळ सुरेश आणि वंदना या दोघांना देखील बसत होती. या महागाइच्या काळात देखील सुरेश वंदनाला आर्थिक मदत करत होता. तिची अडीअडचणीत मदत करत होता. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी काही वर्षापुर्वी सुरेशने घरपोच जेवणाचे डबे देण्याचे देखील काम सुरु केले होते. त्यावेळी वंदनाचे सुरेशच्या घरी येणे  जाणे सुरु झाले होते. तिचा सुरेशच्या पत्नीसह मुलांसोबत परिचय झाला होता. सुरेश देखील वंदनाकडे जात होता. दोघांचे संबंध जणू काही पती पत्नीसारखे रुळले होते. तो वंदनाला तिच्या घराचे भाडे व इतर घरखर्च देत होता. तरीदेखील ती त्याला नेहमी नेहमी पैशांची मागणी करत होती. त्यामुळे सुरेश तिच्यावर कधी कधी चिडून जात होता. पैशांची आवक आणि जावक यांचा ताळमेळ कधी कधी बसत नसल्यामुळे त्याची तिच्यावर चिडचिड होत असे.

संशयीत आरोपी सुरेश महाजन – मयत वंदना पाटील

मधल्या काळात सुरेशला तिच्यात बदल जाणवू लागला. ती कुणाशीतरी बराचवेळ फोनवर बोलत असल्याचे त्याला जाणवू लागले. ती एवढावेळ फोनवर  कुणाशी बोलते हे त्याला ती सांगत नव्हती. तसेच त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ती त्याच्या ताकास तुर लागू देत नव्हती. तो तिला बोलायला अथवा विचारायला गेला म्हणजे ती त्याच्यावरच वाघीणीसारखी डरकाळी फोडत गुरगुरत असे. तसेच संबंध तोडून टाकण्यासाठी त्याच्याकडे जास्तीच्या पैशांची मागणी करत होती. आपले एवढ्या वर्षापासून असलेले प्रेमसंबंध सर्व जगाला माहिती असून आता जर ती कुणासोबत प्रेमसंबंध निर्माण करणार असेल तर त्यात आपल्या नावाची बदनामी होईल असा विचार सुरेश मनाशी करत होता. तसे त्याने तिला समजावले देखील होते. मात्र वंदना त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती.

26 ऑगस्ट रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास सुरेशने वंदना रहात असलेले घर गाठले. त्याने तिला जेवण मागीतले. त्यावर तिने त्याला उद्धटपणे उत्तर दिले की तु तुझ्या हाताने घे. त्यावर सुरेशने जास्त वाद न घालता मुकाट्याने आपले ताट वाढून घेत जेवण करुन घेतले. त्यानंतर दोघे एकाच खोलीत झोपले. रात्री तिन वाजेच्या सुमारास सुरेशने वंदनाला पाणी मागीतले. त्यावर  वंदना त्याला पुन्हा उद्धटपणे म्हणाली की तुझ्या हाताने पाणी घे, तुझे हात मुडले का? त्यावर सुरेश तिला म्हणाला की मी तुला नेहमी पैसे देतो तरीदेखील तु कुठे जात असते? त्यावर तिने दिलेल्या उत्तराने मात्र सुरेशचे डोके पार भडकले.

तिच्या अतिशय खालच्या दर्जाच्या उत्तराने व शिवी देण्याने सुरेश चांगलाच संतापला. त्याने तिला एक चापट मारली. त्याचा संताप एवढा झाला की त्याने जवळच पडलेले एक किलो वजनाचे भाजीपाला मोजण्याचे लोखंडी माप उचलून तिच्या डोक्यावर मारुन फेकले. त्याचा संताप बघून वंदनाने घरातील कांदा कापण्याची सुरी उचलून त्याच्या दिशेने चाल केली. ती त्याच्यावर सुरीचा वार करणार तेवढ्यात सुरेशने शिताफीने तिच्या पोटावर लाथ मारली. पोटात लाथ बसताच ती खाली पडली. तेवढ्यात त्याने तिच्या हातातील सुरी आपल्या हाती घेत तिच्या पाठीवर सपासप वार केले. एवढे केल्यानंतर देखील सुरेशच्या संतापाची लाट जाण्यास तयार नव्हती. त्याने घरात पडलेली कपडे वाळत घालण्यासाठी उपयोगात आणायची दोरी हाती घेतली. त्या दोरीने त्याने तिला गळफास दिला. दोरीचा गळफास आवळला जात असल्यामुळे वंदना तिचे हातपाय झटकत होती. त्याने तिला दरवाज्याच्या भिंतीला बांधून लटकवत ठार केले.

एवढा थरार झाल्यानंतर वंदनाने निश्चितच आपले प्राण सोडले होते. त्यानंतर सुरेशने हातपाय धुतले. तो सकाळीच पावणे पाच वाजेच्या सुमारास आपल्या घरी परत आला. घरुन मोटार सायकल काढली. मोटार सायकल सुरु करुन त्याने थेट चोपडा गाठले. भल्या पहाटे वंदनाचा खून झाल्याची माहिती परिसरात वा-यासारखी पसरली होती. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देखील समजली. या कालावधीत वंदनाचा मारेकरी सुरेश चोपड्याच्या दिशेने पसार झाला होता. घटनास्थळावर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथक दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, पो.नि. प्रताप शिकारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील, रतिलाल पवार, राजेंद्र कांडेकर आदींनी घटनास्थळाला भेट दिली.

या प्रकरणी वंदना पाटील भाड्याने रहात असलेल्या घराचे मालक रमेश सानप यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. या फिर्यादीत मयत वंदना पाटील हिच्याकडे सुरेश महाजन अधून मधून येत जात असल्याचा उल्लेख आला होता. तसेच सुरेश व वंदना यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती परिसरातील लोकांना देखील माहिती होती. त्यामुळे संशयाची सुई सुरेश महाजन याच्या दिशेने जात होती. त्यामुळे वेळ न दवडता गुन्हे शोध पथक तातडीने त्याच्या मागावर निघाले. सुरेश हा चोपडा येथील मुळ रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यामुळे त्याचा मागोवा घेण्यासाठी पोलिस पथकाने चोपडा शहराच्या दिशेने प्रयान केले.  

अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पो.नि. प्रताप शिकारे, पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील यांचे पथक चोपडा येथे रवाना झाले होते. या पथकाने फरार सुरेश महाजन याची चोपडा येथे आल्यावर गुप्त माहिती काढली. तो चोपडा येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महादेव मंदिर परिसरात लपून बसल्याची माहिती पथकाला समजली.

चोपडा येथील पोलीस मित्र मुक्तार शेख सरदार यांनी तपास पथकास मोलाची मदत केली. त्यांनी पोलिस पथकाला तातडीने तीन मोटरसायकली उपलब्ध करुन दिल्या. त्या मोटार सायकलीच्या बळावर त्यांनी सुरेशपर्यंत जाण्याचा पल्ला गाठला. लपून बसलेल्या व तेथून पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या सुरेशला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.  सुरुवातीला त्याने तपास पथकाला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. हे आपले शेत असून आपण शेतात आलो असल्याचे तो पोलिसांना सांगू लागला. आपण वंदनाला ओळखतच नाही अशी त्याने बोलतांना सुरुवात केली. मात्र त्याला एकामागून एक हकीकत सांगत तो जळगाव येथील सप्तशृंगी कॉलनी येथे रहात असल्याचे सांगत पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो बोलता झाला. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याला ताब्यात घेत एमआयडीसी पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली. वृत्त लिखान सुरु असतांना संशयीत आरोपी सुरेश महाजन पोलिस कोठडीत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here