जळगाव – जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागातील रहिवासी पवन हिरालाल ललवाणी यांच्या बंद घरात काही दिवसांपुर्वी चोरी झाली होती. कुणीतरी बनावट चावीने घर उघडून चोरीचा प्रकार केला होता. या घटनेत 22 हजार 500 रुपये रोख व 29 हजार रुपये किमतीचे दागिने असा एकुण 51 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला होता. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कापड दुकानावर काम करणारे पवन ललवाणी यांची पत्नी माहेरी गेल्यामुळे व ते कापड दुकानावर नोकरीला गेल्यामुळे त्यांचे घर 20 ऑग़स्ट रोजी बंद होते. या दिवशी घरी परत आल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी 28 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासात पो.नि. प्रताप शिकारे यांनी सखोल तपास केला. त्यात तक्रारदार ललवाणी यांचा शालक भारत अनिल कुकरेजा याच्याभोवती संशयाची सुई फिरत होती. पवन हिरालाल ललवाणी यांचा शालक भारत कुकरेजा हा गुन्हा घडल्यापासून शहरातून गायब झालेला होता. तो जळगाव शहरात आला असल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने आपला गुन्हा कबुल केला असता त्याला अटक करण्यात आली. अनिल कुकरेजा हा उल्हासनगर व पुणे येथे गेला होता.
त्याला त्याच्या राहत्या घरातून सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सचिन मुंडे, गोविंदा पाटील, सचिन पाटील आदींच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी करण्यात आलेले लॉकेट जप्त करण्यात आले आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. बहिणीच्याच घरी चोरी करणारा अनिल कुकरेजा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या वडीलांवर देखील घरफोडीचे जवळपास विस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत.