जळगाव : मागून आलेल्या कारने पुढे धावणा-या मालवाहू रिक्षाला दिलेल्या धडकेत एक ठार व एक जखमी झाल्याची घटना 2 सप्टेबर रोजी सायंकाळी जळगाव ते जामनेर दरम्यान घडली होती. जळगाव ते जामनेर दरम्यान किचन ट्रॉली फर्नीचरच्या सामानाची वाहतुक करणा-या रिक्षाला धडक देत अपघातासह एकाच्या मृत्यूसह दुस-याला जखमी केल्याप्रकरणी सदर अज्ञात कारचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल अभिमन्यु शारदुल हे जामनेर येथील रहिवासी असून सुतारी काम करतात. 2 सप्टेबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जळगाव एमआयडीसी परिसरातून त्यांनी किचन ट्रॉलीसाठी लागणारा सामान घेतला. तो सामान जामनेर येथे वाहून नेणा-या रिक्षामधेच (एमएच 19 बीएम 5107) ते देखील चालकासोबतच बसले. दरम्यान चिंचोली ते उमाळा दरम्यान पाठीमागून येणा-या कारने (एमएच 19 एपी4696) पुढे धावणा-या रिक्षाला जबर धडक दिली. या धडकेत किचन ट्रॉलीच्या सामानाने भरलेली रिक्षा उलटून खड्ड्यात पडली. त्यात चालक भरत ढोकणे याच्यासह सुनिल शारदुल हे देखील बाहेर फेकले गेले.
त्यावेळी मोठा आवाज झाल्यामुळे लोक जमा झाले. जमलेल्या लोकांनी दोघांना तातडीने जळगाव येथे सामान्य रुग्णालयात दाखल केले. या अपघातात चालक भरत ढोकणे हा मयत तर सुनिल शार्दुल हा जबर जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी सदर कार चालकाविरुद्ध सुनिल शार्दुल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.