जळगाव : प्रसार माध्यम, सायबर सेल आणि बॅंकांकडून वेळोवेळी सावधगिरीचा इशारा देऊनही सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात कित्येक तरुण फसतात. आपला पासवर्ड, बॅंक एटीएम अथवा क्रेडीट कार्डवरील क्रमांक, पिन क्रमांक कुणालाही सांगू नका, बॅंक असा कोणताही पासवर्ड आपल्याला विचारत नाही हे बॅंकेकडून नेहमी सांगितले जाते. मात्र त्याकडे फारसे कुणी गांभिर्याने बघत नाही. त्यामुळे आपली मेहनतीची कमाई कित्येक तरुण आणि कित्येक जेष्ठ नागरिक गमावून बसतात. त्याला कारण म्हणजे सायबर मोहजाल.
मोह हे दुखा:चे कारण असते. आमिषाला, मोहाला बळी पडणे म्हणजे दुखा:ला आमंत्रण देण्याचा प्रकार आहे. आमिषाला अथवा मोहाला फेकून देणे, जवळ फटकू न देणे म्हणजे सुखाला आमंत्रण असते. जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात एका तरुणाची ऑनलाईन लुटमार झाली. या लुटमारीत सुरुवातीला त्याने आठ हजार व नंतर 80 हजार असे एकुण 88 हजार रुपये गमावले.
सैय्यद वसीम आबिद अली हा खासगी नोकरदार तरुण असून त्याचे अॅक्सीस बॅक्वेत पगाराचे खाते आहे. य खात्यावर व्यवहार करण्यासाठी त्याने क्रेडीट कार्ड काढले आहे. गेल्या एप्रिल महिन्यात त्याला एक कॉल आला. पलीकडून बोलणा-याने त्याला म्हटले की आम्ही अॅक्सीस बॅकेतून बोलत आहोत. अॅक्सीस बॅंकेने बाहेर फिरण्यासाठी आपल्यासाठी एक पॅकेज आणले आहे. त्या पॅकेजनुसार बाहेर फिरण्यासाठी गेल्यानंतर हॉटेल बुकींग व जेवणासाठी आठ हजार रुपये खर्च करावा लागेल. त्यानंतर आपल्याला त्यातून चार हजार रुपयांची सुट देण्यात येईल. मात्र त्यासाठी अगोदर आपणास आठ हजार रुपये जमा करावे लागतील.
पलीकडून बोलणा-याने सैय्यद वसिम या तरुणाला आपल्या बोलबच्चनमधे लपेटण्यात सफलता मिळवली. त्यामुळे या मोहाला बळी पडून सैय्यद वसीम याने ट्रान्सडील ट्रॅव्हल्स कार्ड या नावाने मोबाईल फोनच्या माध्यमातून आठ हजार रुपये पाठवले. येथून सैय्यदची फसवणूक सुरु झाली. तो क्रमाक्रमाने मोहाच्या जाळ्यात फसत गेला. त्यानंतर काही दिवसांनी पोस्टाने त्याला एक पाकीट आले. त्यामधे प्रत्येकी दोन हजार रुपयांचे दोन कुपन, एक घड्याळ व एक पाकीट असा ऐवज होता. मात्र सैय्यद वसिम हा तरुण कुठेही गेला नाही व त्याने त्या कुपनचा वापर केला नाही.
त्यानंतर पुन्हा 1 सप्टेबर रोजी त्याला एक कॉल आला. आपण अॅक्सीस बॅंकेतून बोलत आहोत असे पलीकडून बोलणा-याने त्याला म्हटले. कुणीतरी आपली फसवणूक करुन आपणास कुपन पाठवले आहेत. आमच्याकडे त्याबाबत तक्रार आली आहे. त्यामुळे आम्ही संबंधीत सर्व लोकांचे आठ हजार रुपये परत करत आहोत. आठ हजार रुपये परत करण्याचे आमीष दाखवत पलीकडून बोलणा-याने या तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर हळूहळू पलीकडून बोलणा-याने सैय्यदकडून त्याच्या क्रेडीट कार्डच्या कार्डाचा क्रमांक विचारला. सैय्यदने देखील पलीकडून बोलणा-याला त्याच्या क्रेडीट कार्डावरील 16 अंकी क्रमांक त्याला कथन केला. त्यानंतर काही क्षणातच सैय्यदच्या खात्यातून अनुक्रमे 50 हजार आणि 30 हजार रुपयांची ऑनलाईन चोरी झाली. त्याच्या खात्यातून एकुण 80 हजार रुपये गायब झाले. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.