पोलिस असल्याचा बनाव करत दरोडा टाकणारा अटकेत

अहमदनगर – पोलिस असल्याचा बनाव करुन दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर येथून अटक केली आहे. शोयब गुलाब कुरेशी (22) वार्ड क्रमांक 2 श्रीरामपूर असे अटक करण्यात आलेल्याआरोपीचे नाव आहे. गेल्या तिन महिन्यापासून शोयब फरार होता.

27 मे 2021 रोजी पहाटेच्या वेळी श्रीधर जंगलू सोनवणे हे त्यांच्या ताब्यातील टेम्पोने लोखंड, अल्युमिनियम, पितळ व तांबे असलेल्या भंगार मालाची वाहतुक करत होते. भंगार मालाने भरलेला टेम्पो नगरच्या दिशेने घेऊन जात असतांना शनी शिंगणापूर फाट्यानजीक कारने आलेल्या तिघांनी त्यांची वाट अडवली. त्यांना सक्तीने कारमधे बसवून नेत वरवंडी गाव शिवारात आणले गेले. तसेच त्यांचा भंगार मालाने भरलेला टेम्पो चोरुन नेला.

राहुरी पोलिस स्टेशनला या प्रकरणी रितसर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत व फरार शोयब हा श्रीरामपूर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे पो.नि. अनिल कटके यांना समजली होती. त्यांनी आपल्या सहका-यांना त्याच्या अटकेसाठी रवाना केले. स.पो.नि. सोमनाथ दिवटे, हे.कॉ. सुनिल चव्हाण, मनोहर गोसावी, दत्तात्रय हिंगडे, शंकर चौधरी, रणजित जाधव, सागर ससाणे, बबन बेरड यांनी तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here