जळगाव – किराणा दुकानात काचेच्या बरणीत ठेवलेले सोन्याचे दागिने व डब्यात ठेवलेल्या रोकडची रात्री चोरी झाल्याचा प्रकार आज सकाळी एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत उघडकीस आला आहे. तुळजामाता रामेश्वर कॉलनी भागातील सुनंदा किराणा स्टोअर्समधे झालेल्या चोरीचा प्रकार उघड झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
सुरेश तानाजी पाटील व त्यांची पत्नी सुनंदा पाटील असे दोघे जण किराणा दुकान चालवतात. काटकसर करुन जमा केलेल्या जमा पुंजीतून त्यांनी सोन्याचे दागीने तयार केले होते. 1 लाख 88 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व अठराशे रुपये किमतीचे चांदीचे कडे अशा वस्तू पाटील दाम्पत्याने दुकानातील बरणीत ठेवले होते. याशिवाय 60 हजार रुपये रोख त्यांनी एका वेगळ्या डब्यात ठेवले होते. या 2 लाख 49 हजार 800 रुपये मुल्य असलेल्या ऐवजाची चोरी झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे.
4 सप्टेबरच्या रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दुकानाचे कामकाज आटोपल्यानंतर पाटील दाम्पत्याने दुकानाला नेहमीप्रमाणे कुलूप लावले. त्यानंतर ते दुकानाच्या वरच्या मजल्यावर घरात गेले. आज 5 सप्टेबरच्या सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास सुरेश पाटील यांचा मुलगा व पत्नी सुनंदा असे दोघे दुकान उघडण्यास गेले. त्यावेळी त्यांना शटर अर्धवट उघडे दिसून आले. त्यांनी हाक मारुन सुरेश पाटील यांना बोलावून हा प्रकार दाखवला. दुकान उघडले असता दुकानातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले. तसेच सोन्याचे दागिने ठेवलेली बरणी व रक्कम ठेवलेला डबा हा महत्वाचा मुद्देमाल गायब असल्याचे दिसून आले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. घटनास्थळी सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, पो.नि. प्रताप शिकारे, सहायक फौजदार अतुल वंजारी आदींनी भेट देत पाहणी केली.