धुळे – शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथील गुरांच्या डॉक्टरचा चिमठाणे गावानजीक हत्या झाल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. प्रेमसिंग राजेंद्र गिरासे असे हत्या झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करत आरोपींच्या तातडीने अटकेची मागणी केली.
पोलिस अधिक्षक डॉ. चिन्मय पंडीत यांनी यावेळी आंदोलकांची समजूत काढली. या घटनेतील मारेक-यांना लवकरात लवकर शोधून काढले जाईल असे आश्वासन त्यांनी जमलेल्या शोकसंतप्त नातेवाइकांना दिले. दरम्यान रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोघा संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
दराणे येथे प्रेमसिंग गिरासे हे गुरांचे डॉक्टर होते. शिंदखेडा येथील गुरांच्या दवाखान्यात त्यांची प्रॅक्टिस सुरु होती. दुपारी दोन वाजता घरी जात असतांना वाटेत चिमठाणे गावाजवळ तिघा अज्ञातांनी त्यांना अडवले. एकाने मोबाइल आणि दुचाकी हिसकावण्याचा प्रयत्न केला. या कृत्याला विरोध करणा-या डॉ. गिरासे यांच्यावर एकाने चाकूचे वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर मारेकरी पळून गेले. हा प्रकार समजताच गावक-यांनी त्यांना रुग्णालयात नेले. मात्र वाटेतच त्यांचे निधन झाले.