नाशिक (इगतपुरी) – इगतपुरी तालुक्यातील पाडळी रेल्वेस्थानकावर रेल्वे उभी असतांना महिला प्रवाशाच्या पर्समधील 58 हजार रुपयांची झालेली चोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी परराज्यातील टोळक्यास इगतपुरी लोहमार्ग पोलिस स्टेशनच्या पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे.
23 जून रोजी संगीता अरुण दुबे (निपानीया मध्यप्रदेश) व सीमाकुमारी ललितेश्वर प्रसाद (पाटणा) या महिला पाटलीपुत्र एक्स्प्रेसने एलटीटी कुर्ला ते पाटना दरम्यान प्रवास करत होत्या. पाडळी रेल्वे स्थानकावर गाडी उभी असतांना या दोघींच्या उशाखाली ठेवण्यात आलेल्या पर्सची चोरी झाली होती.त्यात 58 हजार रुपये होते.
इगतपुरीच्या लोहमार्ग पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. भरुच (गुजरात) येथे दाखल चोरीच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी दीपक महेंद्रसिंग प्रजापती (22), सुखवीर महेंद्र वाल्मीक (20), सन्नी ऊर्फ सोनी पुरण फुल्ला (30), राहुल चेनाराम वाल्मीकी (26), सर्व रा. टोहना, जि. फतेहबाद, हरियाणा असे सर्व जण अटकेत होते.
अटकेतील चौघांनी पाडळी देशमुखजवळ पाटलीपुत्र एक्स्प्रेस या रेल्वेत चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांना अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सोपान नाईक, पोलिस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड, राजेश सोनवणे, हेमंत घरटे, संतोष परदेशी, नीरज शेंडे, प्रमोद पाहाके, भाऊसाहेब गोहील, सतीश खर्डे, अमोल निचत, योगेश पाटील, रमेश भालेराव, नितीन देशमुख, धनंजय नाईक, भूषण उके, तुषार मोरे आदी या प्रकरणी तपास करत आहेत.