अकोला – नदीत वाहून गेलेले तरुणाचे शव मिळून आल्यानंतर ते पोलिसांच्या ताब्यातून पुन्हा वाहून गेले. कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवत अकोला जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी संबंधीत दोघा पोलिस कर्मचा-यांना निलंबीत केले आहे.
दर्शन शुक्ला हा तरुण रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीत रहात होता. तो गांधीग्राम येथे कावड घेऊन गेला होता. तो घरी परत आला नाही व सापडला देखील नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पुराच्या पाण्यात वाहून गेलेला त्याचा मृतदेह बोरगाव वैराळे नदीत सापडला असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पाण्यात वाहून गेलेला मृतदेह सापडल्यानंतर त्याठिकाणी दोन पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले. मात्र तो मृतदेह पुन्हा पाण्यात वाहून गेला. आपल्या मुलाचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यातून पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्याच्या आइवडीलांनी पत्रकार परिषदेच्या माध्य्मातून पोलिस अधिक्षकांना केली. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी नेमाळे व झापर्डे या दोघा पोलिस कर्मचा-यांना निलंबीत केले आहे.