जळगाव – एक वृद्ध सापांना पकडून त्यांचे दात विळ्याने तोडत असल्याचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या वृद्धाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी वन्यजीव संस्थेकडून केली जात आहे.
समाज माध्यमात प्रसारीत झालेल्या व्हिडीओमधे एक वृद्ध हातातील कपड्याने कोब्रा जातीचा साप पकडून विळ्याने त्याचे तोंड कापत दात काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओत देखील तीच व्यक्ती हातातील कपड्याच्या मदतीने धामण साप पकडत असल्याचे दिसते. तो धामण साप गळ्यात घालून फिरत असल्याचे दृश्य त्यात आहे. काही व्यक्ती धामण सापाला काठीने मारत असल्याचे देखील दिसत आहे.
वन्यजीव संरक्षण संस्थेने याबाबत शोध घेतला असता असे प्रकार म्हसावद गावात नेहमीच घडत असतात व अशा प्रकारे साप पकडून त्यांना निर्दयीपणे मारले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका वृद्धाने कित्येक साप पकडून त्याचे दात विळ्याने तोडले आहेत. या वृद्धासह सापांना निर्दयीपणे ठार करणा-यांवर कारवाई होण्याची मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे यांच्याकडून वन विभागाकडे करण्यात आली आहे.