औरंगाबाद – पोलिस शिपाई चालक पदाची परिक्षा देण्यासाठी पोलिस कन्येच्या नावावर अल्पवयीन मुलगी डमी उमेदवार म्हणून आल्याचे परिक्षा केंद्रावरील तपासणीत व चौकशीत उघड झाले. पुजा रामदास दिवेकर असे मुळ उमेदवार असलेल्या पोलिस कन्येचे नाव आहे. तिला ताब्यात घेण्यात आले आहे. डमी उमेदवार अल्पवयीन मुलीच्या पालकांना बोलावून नोटीस देत तिला सोडून देण्यात आले आहे.
पोलिस शिपाई चालक पदासाठी 3360 जणांपैकी 1491 जणांनी बुधवारच्या दिवशी दहा केंद्रावर परिक्षा दिली. एमआयटी महाविद्यालयात असलेल्या केंद्रावर परिक्षा सुरु होती. या केंद्रात सर्व वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे तैनात होते. यावेळी एक अल्पवयीन मुलगी पावणे दहा वाजेच्या सुमारास परिक्षा देण्यासाठी आली.
प्रवेशद्वारावर तपासणी करणा-या अधिका-यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना तिने आपले नाव पुजा दिवेकर असे कथन केले. मात्र तिच्या हॉल तिकीटावर फोटो वेगळा दिसत होता. तिची सखोल चौकशी केली असता तिने आपले खरे नाव सांगितले. आपल्याला पुजा रामदास दिवेकर (रा. स्वामी विवेकानंद नगर एन 12 हुडको) या परिक्षार्थीच्या नावावर परिक्षा देण्यासाठी रणजीत राजपूत याने पाठवले असल्याचे तिने कबुल केले.
मुळ उमेदवार असलेल्या पुजा दिवेकर हिने डमी उमेदवार पाठवण्याचे कंत्राट रणजित राजपूत (शेकटा ता. औरंगाबाद) याला सहा लाख रुपयात दिले असल्याचे म्हटले जात आहे. राहुलच्या सांगण्यावरुन ती अल्पवयीन मुलगी पुजा दिवेकर हिच्या नावाने चालक पोलिस शिपाई पदाची परिक्षा देण्यासाठी आली होती. याकामी तिला मध्यस्त रणजीत राजपूत हा पैसे देणार होता.







